वर्धा : लोकसभेची ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. ही निवडणूक अंतिम असून यानंतर निवडणूकच होणार नाही. ईडी, आयटी आणि सीबीआय या यंत्रणांच्या जोरावर तोडफोडीच्या राजकारणातून लोकशाहीला चिरडून सत्ता कायम राखण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुन्हा सत्तेत आल्यास भारताचे संविधान बदलणार, आरक्षण संपविणार. त्यामुळे आताच निर्णय घेण्याची गरज असल्याचे आवाहन आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांनी केले.
महाविकास आघाडीच्या प्रचारसभेकरिता ते वर्ध्यात आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका केली. ते म्हणाले की, यंत्रणांचा धाक दाखवून नेत्यांना तुरुंगात डांबले जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही तुरुंगात टाकले असून त्यांना मधुमेहाचा आजार असल्याने इन्सुलिन देण्याची व्यवस्थाही केली जात नाही, हा अत्याचार आहे. येथे उद्धव ठाकरे यांचा धनुष्यबाण आणि शरद पवार यांचे घड्याळ पळविले. त्यांच्या पक्षात फूट पाडून एकमेकांच्या विरोधात उभे केले. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रदेश असून त्यांच्या धोरणानुसार ‘गद्दारांना माफी नाही’ ही भूमिका घेण्याची गरज आहे. देशातील महागाई, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव, काळा पैसा, खात्यामध्ये १५ लाख, यापैकी एकही आश्वासन पूर्ण झाले नसल्याने या सरकारची खोटे बोलण्याची ‘गॅरंटी’ नक्कीच आहे, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे डॉ. शिरीष गोडे, इंडिया अलायन्सचे अविनाश काकडे यांच्यासह आपचे पदाधिकारी उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर पंतप्रधान विचलितलाेकसभेचे पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असून दहा वर्षांतील सत्तेचा लेखाजोखा मतदारांनी मतातून व्यक्त केला आहे. ही निवडणूक आता पक्षाची राहिली नसून जनतेची झाली आहे. त्यामुळे एकंदरीत चित्र पाहता पंतप्रधानही विचलित झाले आहेत. हे त्यांच्या भाषणातून दिसायला लागले आहे. यावरून मतदार आता त्यांना घरचा रस्ता दाखविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही खासदार सिंग म्हणाले.