चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्ह्याला थोर पुरुषांचा वारसा लाभल्याने जिल्हा दारुबंदी म्हणून घोषित करण्यात आला. मात्र, तरीही वर्धा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारुची वाहतूक तसेच विक्री होताना दिसते. याच दारुबंदी जिल्ह्यात मागील वर्षभरात केवळ वर्धा उपविभागातील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करत २० हजार ५१३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, तब्बल १ कोटी २५ लाख ८९ हजार रुपयांचा देशी, विदेशी दारुसाठा पोलिसांनी जप्त करत सुमारे दीडशेवर दारु विक्रेत्यांना बेड्या ठोकल्याची माहिती आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारुची विक्री केली जाते. दारु विक्रीवर अंकुश लावण्यासाठी पोलीस विभागासह राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यरत आहेत. मात्र, केवळ पोलिसांकडूनच शहरातील दारु विक्रेत्यांवर कारवाई केली जात असल्याचे अनेकदा दिसून आले. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. वर्धा उपविभागात येणाऱ्या वर्धा, रामनगर, सावंगी, सेवाग्राम, दहेगाव, सेलू तसेच सिंदी रेल्वे पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपापल्या हद्दीत कारवाई करत तब्बल सव्वा कोटी रुपयांचा दारुसाठा हस्तगत करत दारु विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनात कारवाई केल्या जात आहे.
वाहनांसह १.१८ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत- पोलिसांनी मागील वर्षभरात जप्त केलेल्या दारुसाठ्यासह विविध प्रकारच्या दारुची वाहतूक करणारे वाहन तसेच इतर साहित्य असा एकूण १ कोटी १८ लाख ३१ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, ही जप्त केलेली वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.
गांजाचे झुरके ओढणारे २८ गुन्हेगार जेरबंद - गांजा किंवा तत्सम प्रकारच्या अमली पदार्थांचे सेवन करणे तसेच त्याची विक्री करणे कायद्याने गुन्हा असल्याने पोलिसांनी गांजाचे झुरके ओढणाऱ्या २८ जणांना पोलिसी हिसका दाखवून अटक केली आहे. तसेच विक्रेत्यांवरही कारवाई केली आहे.
३००वर जुगाऱ्यांना ठोकल्या बेड्या - मागील वर्षभरात वर्धा उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात सातही पोलीस ठाण्यांतील पोलिसांनी जुगाऱ्यांवर कारवाई करत तब्बल ३४२ गुन्हे दाखल करुन सुमारे ३००वर जुगाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच २४ लाख ४२ हजार १०१० रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली.
शस्त्र बाळगणाऱ्या १०३ जणांवर कारवाई - शस्त्राच्या धाकावर नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या तसेच शिवीगाळ करणाऱ्या तब्बल १०३ गावगुंडांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.