वर्धा : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करून मुलीला तब्बल १० दिवस एका घरात डांबून ठेवले. यादरम्यान पीडितेशी असभ्य वर्तनही करण्यात आले. अखेर पीडितेने स्वत:ची कशीबशी सुटका करून आर्वी पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. आर्वी पोलिसांनी तब्बल ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केल्याची माहिती दिली.
प्राप्त माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील रहिवासी १५ वर्षीय पीडिता सध्या आर्वी येथे वास्तव्य करीत आहे. आर्वी शहरातील गुरुनानक धर्मशाळा परिसरातील रहिवासी संगीता नामक महिलेने पीडितेला तिचा मुलगा नीलेश याचा फोटो दाखवून माझ्या मुलासोबत लग्न कर, असे आमिष देत तिचे अपहरण केले. पीडितेचे अपहरण करण्यासाठी बाल्या नामक युवक आणि एका अज्ञात व्यक्तीने संगीता नामक महिलेची मदत केली. संगीता हिच्या काकूने पीडितेला काही दिवस वर्धमनेरी येथील स्वत:च्या घरी ठेवले. त्यानंतर काही दिवस जळगाव येथे अशोक ठाकरे याच्या घरी ठेवले. पीडितेच्या बयाणानुसार अशोक ठाकरे याच्या घरी राहत असताना तेथे एका युवकाने पीडितेसोबत असभ्य वर्तनही केल्याचे तिने सांगितले. यानंतर संगीता पीडितेला घेऊन नागपूर जिल्ह्यातील मगरढोकला येथील रहिवासी वसंत डोंगरे याच्या घरी गेली. तेथेही पीडितेला काही दिवस एका खोलीत ठेवण्यात आले.
पीडितेने कशीबशी केली स्वत:ची सुटका
संगीता नामक महिलेने पीडितेला मुलाशी लग्न करण्याचे आमिष दाखवून पळवून नेले. तब्बल दहा दिवस विविध ठिकाणी तिला डांबून ठेवले. अखेर पीडितेने स्वत:ची कशीबशी सुटका करून थेट आर्वी पोलिसांत धाव घेत सर्व आपबिती कथन केली. पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची तत्काळ दाखल घेत पोलीस पथक रवाना करून दोघांना अटक केली.
आंतरराज्यीय टोळी असण्याचा संशय
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पीडितेला तब्बल १० दिवस विविध ठिकाणी डांबून ठेवणे ही बाब गंभीर आहे. मानवी तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय झाल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी सखोल चौकशी करून यासंदर्भात माहिती गोळा करून उर्वरित आरोपींना देखील तत्काळ अटक करण्याची गरज आहे.