वर्धा : शासकीय मुलांच्या बालगृहातून ११ वर्षीय मुलाला अज्ञाताने पळवून नेल्याची घटना केळकरवाडी परिसरातील बालगृहात घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, मुलाच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना झाली आहेत. १३ रोजी पोलिसांनी बालसुधारगृहात जात चौकशी केल्याची माहिती बालगृह निरीक्षक अशोक पिव्हाल यांनी दिली.
प्राप्त माहितीनुसार, केळकरवाडी येथे असलेल्या शासकीय मुलांच्या बालगृह (वरिष्ठ) येथे अल्लीपूर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक नलवडे यांनी एका ११ वर्षीय बेवारस मुलाला ९ सप्टेंबर रोजी दाखल केले होते. दाखल केल्यानंतर तो बालगृहातील हॉलमध्ये झोपला. दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्यानंतर तो बाथरूममध्ये गेला. मात्र, बराच वेळ तो बाथरूममधून बाहेर न आल्याने त्याला बघण्यासाठी बालगृहातील काळजीवाहक गेले असता तो तेथे दिसून आला नाही. त्याचा बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी ठिकाणी शोध घेऊनही तो मिळून न आल्याने त्याला अज्ञाताने पळवून नेल्याची तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली. पोलिसांनी १३ रोजी बालगृहात जात पंचनामा करून चौकशी करीत मुलाच्या शोधार्थ पथके पाठविण्यात आल्याची माहिती बालगृहातील काळजीवाहक पिव्हाल यांनी दिली.