दहावीचा निकाल ८०.१२ टक्के : २७४ शाळांतून १५ हजार १३१ विद्यार्थी उत्तीर्ण लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान वर्धेच्या अग्रगामी हायस्कूल येथील अभिमन्यू सुनील कुटेमाटे याने पटकाविला. त्याला ९८.२० (४९१ गुण) टक्के मिळाले. तर जिल्ह्यातून दुसरा येण्याचा मान तीन विद्यार्थ्यांनी संयुक्तरित्या पटकाविला आहे. यात हिंगणघाट येथील एसएसएम विद्यालयाची तेजस्विनी भास्कर नवघरे हिच्यासह अग्रगामी हास्कूलची श्रेया कमलेश आकरे व सुशील हिंमतसिंगका येथील मोहित देवेंद्र चांदोरे या तीन विद्यार्थ्यांनी ९७.६० टक्के घेतले आहे. यंदाच्या सत्रात एकूण १५ हजार १३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याची टक्केवारी ८०.१२ एवढी आहे. उत्तीर्ण झालेल्यांत ७ हजार ७०४ मुले असून त्यांची टक्केवारी ७४.६७ टक्के आहे. तर ७ हजार ७२४ मुली असून त्यांची टक्केवारी ८६.१५ एवढी आहे. या निकालातही मुलींनीच आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील २७४ शाळांमधून एकूण १८ हजार ९४८ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला होता. यात ९ हजार ९५९ मुले आणि ८ हजार ९८९ मुलींचा समावेश होता. यातील १८ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ९,९२० मुले आणि ९,९६६ मुलींनी परीक्षा दिली. सर्वाधिक निकाल ८३.४२ टक्के निकाल वर्धा तालुक्याचा आहे. तर सर्वात कमी ७५.८५ टक्के निकाल सेलू तालुक्याचा आहे. या व्यतिरिक्त आर्वी ७८.१२, आष्टी (शहीद) ७६.९५, देवळी ८०.३२, हिंगणघाट ८१.३५, कारंजा (घाडगे) ७४.७८ तर समुद्रपूर तालुक्याचा निकाल ७९.७९ टक्के आहे. जिल्ह्यातील १९ शाळांचा निकाल १०० तर आठ शाळांचा निकाल ३६ टक्क्यांच्या आत आहे.
अभिमन्यू कुटेमाटे जिल्ह्यातून प्रथम
By admin | Published: June 14, 2017 12:49 AM