वर्धा : अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात बुधवारी नवे वळण मिळाले. पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक आणि पालिका पथकाला पाचारण करून डॉ. रेखा कदम यांच्या रुग्णालयामागील परिसरात खोदकाम केले. दरम्यान, जमिनीत पुरलेले भ्रूण अवशेषासह चार ते पाच कवट्या, रक्ताने माखलेले कपडे, एक गर्भपिशवी आढळून आले. सुमारे तीन ते चार तास खोदकाम सुरू होते. या सर्वांचे पोलिसांनी चित्रिकरण केले.
स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. रेखा कदम यांनी अल्पवयीन मुलीचा ३० हजारात गर्भपात केल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी डॉ. रेखा कदमसह मुलाच्या आईवडिलांना अटक केली होती. बुधवारी सकाळी कदम रुग्णालयाच्या मागील परिसरात खोदकाम केले असता भ्रूण अवशेष आणि काही हाडे आणि गर्भपिशवी आढळून आली. बुधवारी पुन्हा डॉ. कदम हिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने डॉ. रेखा कदम हिची कारागृहात रवानगी केली.
डीएनए टेस्टसाठी पाठविले अवशेष
रुग्णालयामागील खड्डा बायोगॅस प्रकल्पाचा होता. मात्र, तो वापरात नसल्याने या खड्ड्यात इतर वेस्टेज साहित्य टाकले जात होते. पंचांसमक्ष अनेक बाबी जप्त केल्या असून जप्त करण्यात आलेले अवशेष डीएनए टेस्टसाठी पाठविण्यात येणार आहे. तसेच हाडांचे अवशेष जनावरांचे की माणसांचे ही बाब अहवाल प्राप्त झाल्यावरच कळेल.
कदम हॉस्पिटलचे गर्भपात केंद्र सरकारमान्य आहे. मुलीचा गर्भपात डॉ. रेखा कदम यांनी केला नाही. त्यांच्यावर खोटा गुन्हा केला. मुलगी दाखल झाल्याचा रेकॉर्ड नाही. सोनोग्राफी नाही. येथील सर्व रेकॉर्ड पोलिसांनी जप्त केले आहे. पोलिसांनी खड्ड्यातून काही हाडांचे अवशेष, गर्भपिशवी जप्त केली आहे. या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रसूती होतात, ऑपरेशन होतात त्यामुळे कमी दिवसाच्या बाळ असलेल्या विवाहित स्त्रीची ही गर्भपिशवीही असू शकते याची तपासणी होईलच.
- डॉ. नीरज कदम, कदम हॉस्पिटल.
गर्भपात प्रकरणात काही भ्रूण अवशेष जप्त केले आहे. ते डीएनए टेस्टसाठी पाठविण्यात येणार आहे. बुधवारी डॉ. रेखा कदम हिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कारागृहात रवानगी केली आहे.
- ज्योत्स्ना गिरी, पोलीस उपनिरीक्षक विशेष सेल, आर्वी.