आर्वी (वर्धा) : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोमवारी रीतसर परवानगी घेऊन सकाळी महिला डॉक्टरला अटक केली. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
अटक केलेल्या डॉक्टर आर्वी शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. तर या प्रकरणात एका अल्पवयीन मुलालाही अटक करण्यात आली. मिळालेल्या प्राथमिक माहिती प्रमाणे आर्वी शहरातील अल्पवयीन मुलाचे अल्पवयीन मुलीसोबत सोबत सूत जुळले. मुलगा साडे सतरा वर्षाचा, तर मुलगी तेरा वर्षांची आहे. यातच मुलीला गर्भधारणा झालीय या प्रकरणाची वाच्यता होऊ नये म्हणून गर्भपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. ८० हजार रुपयात हा गर्भपात करण्यात आला.
याबाबत शनिवारीला रात्री आर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली यावरून पोलिसांनी रात्रीच रीतसर परवानगी घेऊन लगेचच कार्यवाही करण्याच्या हालचाली केल्या. मात्र रात्री घर आणि दवाखाना बंद असल्याने पोलिसांनी रात्रभर पाळत ठेवावी लागली आणि सकाळी महिला डॉक्टरला सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना सोनुले आणि पथकाने अटक केली अशी माहिती मिळाली.
या प्रकरणात पॉक्सो अंतर्गत व बेकायदेशीर, गर्भपात इतर परवानगी न घेता अल्पवयीन मुलीचा गर्भपात आदी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंके ठाणेदार भानुदास पिदुरकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पॉस्को सेलच्या उपनिरीक्षक जोशना गिरी या घटनेचा तपास करीत आहे.