किसान अधिकार अभियानाचा तालुका कृषी कार्यालयात ठिय्या सेलू : गत दोन वर्षात तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाण्याची बचत व्हावी व पिकांना समप्रमाणात पाणी देता यावे म्हणून तुषार व ठिबक संच खरेदी केले. शेतकऱ्यांना यावर मिळणारे शासकीय अनुदान अद्याप मिळाले नसल्याने मंगळवारी किसान अधिकार अभियानच्यावतीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. सिंचनाची सोय करून अधिक उत्पन्न घेण्याकरिता शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज घेत ठिबक व तुषार संच विकत घेतले. यात शेतकऱ्यांना शासनाकडून सबसिडीचा लाभ मिळणार होता. याला दोन ते तीन वर्षांचा कालावधी झाला तरी सबसिडी मिळाली नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन अडचणीत आले आहे. बँकेतील कर्जाच्या व्याजाचे ओझेही वाढले आहे. याबाबत जिल्हा कृषी अधीक्षकांना तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देवूनही काहीच कार्यवाही झाली नाही. १६२ तुषार संचाचे २३ लाख १३ हजार ८४६ तर १५ ठिबक संचाचे १५ लाख रुपयांचे अनुदान कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना घेणे आहे. जिल्ह्यातही बहुतांश शेतकऱ्यांचे अनुदान प्रलबिंत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या बाबतचे निवेदन आमदार पंकज भोयर यांनाही दिले आहे. या शेतकऱ्यांना सबसीडी देण्याची मागणीकरिता किसान अधिकारी अभियानचे जिल्हाध्यक्ष सुदाम पवार, तालुकाध्यक्ष विठ्ठल झाडे, सुरेश राऊत, नीलेश उडाण, गोविंदा पेटकर, प्रभाकर बजाईत, विठ्ठल गुजरकर, वसंता लटारे, नामदेव पिंपळे आदींनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला.यावेळी सेलू मंडळ अधिकारी राजेंद्र जावंधिया, तालुका कृषी अधिकारी बाबूराव वाघमारे यांच्याशी चर्चा करण्यात आली.(शहर प्रतिनिधी)
१७७ शेतकऱ्यांचे ३८.१३ लाख थकले
By admin | Published: September 09, 2015 2:15 AM