लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: पीक कर्जाची प्रकरणे वेळीच निकाली काढण्याची विनंती करण्यासाठी गेलेल्या प्रहारच्या जिल्हा प्रमुखांशी हुज्जत घालत बँकेच्या अधिकाऱ्यांनी चक्क हातापाई केल्याची घटना बुधवारी आष्टी तालुक्यातील साहूर येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत घडली. विशेष म्हणजे पीककर्जाविषयी अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला साल्या म्हटल्याचे पुढे आल्यावर हा विषय चिघळला गेला.
खरीप हंगाम सुरू झाला असला तरी साहूर येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पीक कर्जाची अनेक प्रकरणे प्रलंबीत असल्याच्या तक्रारी प्रहारकडे प्राप्त झाल्या. त्यानंतर प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे यांनी प्रत्यक्ष साहूर येथील बँक ऑफ इंडियाची शाखा गाठून संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली. बँकेचे अधिकारी आणि प्रहारच्या जिल्हा प्रमुख यांच्यात चर्चा सुरू असतानाच पीक कर्जाचे प्रकरण निकाली निघाले काय अशी विचारणा करण्यासाठी आलेल्या एका शेतकऱ्याला बँकेच्या अधिकाऱ्याने साल्या म्हणत हाकलून लावल्याची बाब पुढे आली.
त्यानंतर बँकेचे अधिकारी आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांमधील शाब्दिक वाद विकोपाला जाऊन प्रकरण हातापायीपर्यंत पोहोचले. पण वेळीच विकास दांडगे यांनी मध्यस्थी केल्याने वाद निवळला. बँकेचे अधिकारी पीककर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना विविध कारणे पुढे करून नाहक त्रासच देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. येत्या चार दिवसात ही प्रकरणे निकाली काढा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा प्रहारने दिला आहे.