वर्धा : सर्वत्र महसूल दिनाचा कार्यक्रम धूमधडाक्यात सुरू असतानाच देवळी येथील निवासी नायाब तहसीलदाराने कार्यक्रम आटोपताच शेतकऱ्याकडून तीन हजारांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी १ रोजी दुपारी ४ ते ४:३० वाजेदरम्यान देवळी येथील तहसील कार्यालयात करण्यात आली. किशोर शेंडे (५१), रा. वैष्णवी कॉम्प्लेक्स, कारला चौक, वर्धा असे अटक केलेल्या लाचखोर नायब तहसीलदाराचे नाव असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, वर्धा येथील मास्टर कॉलनी येथील रहिवासी तक्रारदार शेतकरी हा आपसी वाटणीपत्र तयार करण्याचे काम करतो. त्यासाठी तो वारंवार तहसील कार्यालयाच्या येरझऱ्या मारत होता. मात्र, आपसी वाटणीपत्र तयार करण्यासाठी नायब तहसीलदार किशोर शेंडे याने आपसी वाटणीपत्र तयार करण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती आठ हजार रुपयांत सौदा पक्का झाला. तीन हजार रुपये पहिले आणि पाच हजार रुपये नंतर देण्याचे ठरले. आज १ ऑगस्ट रोजी सर्वत्र महसूल दिवस साजरा होत असतानाच नायब तहसीलदार शेंडे याने तक्रारदाराला तहसील कार्यालयात पैसे घेऊन बोलाविले. तक्रारदाराने जवळील तीन हजार रुपयांची रक्कम शेंडे याला देताच सापळा रचून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने रंगेहात अटक लाच स्वीकारताना नायब तहसीलदारास अटक केली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल मानकीकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपाधीक्षक अभय आष्टेकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संदीप मुपडे, संतोष बावणकुळे, कैलास वालदे, प्रीतम इंगळे, नीलेश महाजन, प्रशांत मानमोडे यांनी केली.
वर्ध्यातील निवासस्थानी तपासणी
लाचखोर नायब तहसीलदार शेंडे याला देवळी येथील तहसील कार्यालयातून अटक केल्यानंतर लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी त्यास पोलिस वाहनात बसून थेट वर्धा आणले. वर्ध्यातील त्याच्या निवासस्थानी जात तपासणी करीत घराची झाडाझडती घेतल्याची माहिती आहे. या कारवाईने तहसील परिसरात एकच खळबळ उडाली होती.