लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर राज्याचा महत्त्वाकांशी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाच्या कामाला ब्रेक लागला. शिवाय सदर मार्गाचे काम पूर्णत्त्वास नेणाऱ्या मजुरांचा रोजगार हिरावला होता; पण आता याच महामार्गाच्या कामाला पुन्हा नव्या जोमाने परवानगी घेत सुरूवात करण्यात आली आहे. शिवाय या कामादरम्यान कुठल्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रसार होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरूवात झाल्याने सुमारे २ हजार २०० मजुरांसह कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे.वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू तसेच आर्वी तालुक्यातील एकूण ३४ गावांमधून समृद्धी महामार्ग गेला आहे. वर्धा जिल्ह्यातून गेलेल्या एकूण ६०.७४ किमीच्या मार्गासाठी सदर तिन्ही तालुक्यांमधील ६०२.९३ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. अधिग्रहित झालेल्या जमिनीच्या मोबदल्यात सरळ खरेदीतून ३७९.८८ कोटी शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. तर शासनाकडून विविध परवानग्या घेतल्यानंतर प्रत्यक्ष कामालाही सुरूवात करण्यात आली. महाराष्ट्र राज्यासाठी महत्त्वाकांशी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ब्रेक लागला होता. त्यामुळे सुमारे २ हजार २०० मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आणि शासनाचा महत्त्वाकांशी प्रकल्प या दोन्ही बाजू केंद्रस्थानी ठेऊन ग्रीन झोन असलेल्या वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाच्या कामाला पुन्हा नव्या जोमाने सुरूवात करण्यात आली आहे. या कामादरम्यान सोशल डिस्टन्सिंग यासह कोरोनाचा प्रसार होऊ नये यासंबंधिच्या विविध प्रतिबंधात्मक उपायांचे मजुरांकडून पालन केले जात आहे.विभागांकडून प्रस्ताव आल्यास मिळणार परवानगीकोरोनाच्या ग्रीन झोन मध्ये असलेल्या वर्धा जिल्ह्याचे विविध विषय आणि कामकाज पुर्ववत येण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाऊले टाकण्यास सुरूवात करण्यात आली आहे. अत्यावश्यक असलेली कामे लॉकडाऊनच्या काळात सुरू करावयाची असल्यास विविध विभागांनी तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवावा. त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.अधिकाऱ्यांकडून केली जाते वेळोवेळी पाहणीलॉकडाऊनच्या काळात वर्धा जिल्ह्यातून गेलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामाला नियम व अटींचे पालन करून गती दिली जात आहे. असे असले तरी खरोखर नियमांचे पालन होत आहेत काय याची शहानिशा प्रत्यक्ष काम सुरू असलेल्या ठिकाणी वेळोवेळी भेट देऊन अधिकाºयांकडून केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या कामादरम्यान कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, अशा सूचनाही कंत्राटदाराला देण्यात आल्या आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात काही नियम व अटींवर समृद्धी महामार्गाच्या कामाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे २ हजार २०० मजुर व कामगारांना रोजगार मिळाला आहे. ग्रीन झोन असलेल्या वर्धा जिल्ह्याचा आर्थिक व विकासात्मक गाढा पुन्हा पूर्वस्थितीत कसा येईल यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न होत आहेत.- अशोक लटारे, अपर जिल्हाधिकारी, वर्धा.
समृद्धी महामार्गाच्या कामाला जिल्ह्यात वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 5:00 AM
वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू तसेच आर्वी तालुक्यातील एकूण ३४ गावांमधून समृद्धी महामार्ग गेला आहे. वर्धा जिल्ह्यातून गेलेल्या एकूण ६०.७४ किमीच्या मार्गासाठी सदर तिन्ही तालुक्यांमधील ६०२.९३ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. अधिग्रहित झालेल्या जमिनीच्या मोबदल्यात सरळ खरेदीतून ३७९.८८ कोटी शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. तर शासनाकडून विविध परवानग्या घेतल्यानंतर प्रत्यक्ष कामालाही सुरूवात करण्यात आली.
ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे लागला होता ब्रेक : सोशल डिस्टन्सिंगचे पालन