लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याचे स्थळ अशी वर्धा शहराची ओळख. पण याच वर्धा शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या वर्धा नगरपालिकेतील अग्निशमन विभागाला सध्या घरघर लागल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. न.प.च्या या विभागात मंजूर मनुष्यबळापैकी अतिशय अल्प मनुष्यबळ कार्यरत असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे.वर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागात सध्या स्थितीत एकच अग्निशमन बंब कार्यरत आहे. पण तोही तब्बल १६ वर्ष जूना असल्याने एखादी अनुचित घटना घडल्यावर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. काही नवीन अग्निशमन बंब खरेदी करण्याचे न.प. प्रशासनाच्या विचाराधीन असले तरी अद्यापही नवीन अग्निशमन बंब खरेदी करण्यात आलेला नसल्याचे वास्तव आहे. नगरपालिकेच्या या विभागाला सक्षम करण्याची गरज असून त्यासाठी तेथील अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी वेळीच योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.
दहा महिन्यांत २५ घटना जानेवारी ते ऑक्टोबर २०२० अखेरपर्यंत वर्धा शहराच्या कार्यक्षेत्रात तब्बल २५ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. याची नोंद वर्धा नगरपालिकेच्या अग्निशनम विभागाने घेतली आहे. पण पालिकेच्या या विभागात अतिशय अल्प मनुष्यबळ असल्याने कार्यरत अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे.
एकच अग्निशमनबंब; पण तोही जूनाचवर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागात दोन अग्निशमन बंब होते. पण त्यापैकी एक अग्निशमन बंब तब्बल २२ वर्ष जूना असल्याने त्याचा वापर करणे बंद करण्यात आले आहे. तर जो अग्निशमन बंब सध्या वापरला जात आहे तो १६ वर्ष जुना असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे न.प.च्या अग्निशमन विभागाला नवीन अग्निशमन बंबाची प्रतीक्षा आहे.
न.प.च्या अग्निशमन दलात कर्मचाऱ्यांचा अभाव वर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागात दोन अधिकारी, आठ फायरमन तर चार चालकांची मंजूर पद आहेत. अधिकची माहिती जाणून घेतली असता वर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागात सध्या दोन अधिकारी, दोन फायरमन आणि दोन चालक कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.
न.प.च्या अग्निशमन विभागात सध्या सहा फायरमन आणि दोन चालकांची पदे रिक्त आहेत. तर पालिकेचा अग्निशमन बंब सुमारे १६ वर्ष पूर्वीचा असल्याने नवीन अग्निशमन बंब खरेदी करण्याचे पालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे. लवकरच अग्निशमन बंब खरेदी केला जाईल.- रविंद्र जगताप, विभाग प्रमुख, अग्निशमन विभाग, न.प. वर्धा.