मृत्यूचे कारण गुलदस्त्यातच : पोलिसांना पॅथालॉजी अहवालाची प्रतीक्षा, देशमुख यांच्या अटकेसाठी आज दवाखाने बंद आर्वी : येथील डॉ. प्रतिभा पावडे यांच्या रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांच्या घरावर व दवाखान्यात तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी वैद्यकीय संघटना शिवसेना जिल्हा प्रमुख नीलेश देशमुख यांच्या अटकेसाठी सरसावल्या आहे, तर दुसरीकडे शिवसेना महिलेच्या मृत्यूला जबाबदार धरुन डॉ. पावडे दाम्पत्यांवर गुन्हे दाखल करुन अटकेच्या मागणीसाठी पुढे आली आहे. यावरुन या प्रकरणाला नवे वळण आले असून पोलिसांच्या एकूणच तपासाकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी सेवाग्राम रुग्णालयात मृत महिलेचे शवविच्छेदन केले. मात्र अद्याप अहवाल प्राप्त न झाल्याचे पोलीस सांगत आहे. या अहवालात नेमके काय दडले, याकडे जनतेचे लक्ष लागून आहे. शवविच्छेदन अहवाल तयार झालेला आहे. परंतु पॅथालॉजी अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा असल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण पुढे येणार नाही. पोलिसांना पॅथालॉजी अहवालाची प्रतीक्षा आहे, अशी माहिती आर्वीचे ठाणेदार अशोक चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.(शहर प्रतिनिधी) अंकिता चव्हाण ही महिला गरोदर होती. तिला तिसरे अपत्य नको होते. शासन मान्य गर्भपात केंद्र असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी तिच्या पतीची परवानगी घेण्यात आली. शस्त्रक्रियेपूर्वी सर्व तपासण्या करण्यात आल्या. सर्व तपासण्या नार्मल होत्या. परंतु तिला भुल देण्यापूर्वी इन्फेक्शन होऊ नये म्हणून इंजेक्शन द्यावे लागते. या इंजेक्शनने तिला रिअॅक्शन झाले. यातच तिला मृत्यू झाला. या सर्व गोष्टी तिच्या पतीसमक्ष घडल्या. तिच्या पतीला शवविच्छेदन करण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांनी सर्व घटनाक्रम बघता नकार दिला. अखेर आपणच पोलिसांत या घटनेची फिर्याद नोंदविली. - डॉ. प्रतिभा पावडे, स्त्री रोग तज्ज्ञ, आर्वी. डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत- पतीचा आरोप पत्नीचा मृत्यू हा डॉक्टरांनी वेळेवर उपचार न करता केलेल्या हलगर्जीमुळे मृत्यू झाला, असा आरोप मृत महिलेचा पती गजानन चव्हाण यांनी शुक्रवारी आर्वीत शिवसेनेच्यावतीने बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत केला. याप्रकरणी आर्वी येथील डॉ. पावडे दाम्पत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली. शनिवारी आर्वीतील पावडे हॉस्पिटल येथे यवतमाळ जिल्ह्यातील तपोना या गावातील अंकिता चव्हाण नामक महिला पोटदुखीच्या आजारावरुन डॉ. पावडे यांच्या रुग्णालयात दाखल झाली होती. यावेळी स्त्री प्रसुती तज्ज्ञ डॉ. प्रतिभा पावडे यांनी सदर महिलेची तपासणी केली असता सदर महिला गरोदर असल्याने पोट दुखत असल्याचे सांगितले. शिवसेनेचा मूकमोर्चा आर्वी- डॉ. प्रतिभा पावडे यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत डॉ. पावडे दाम्पत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा मागणीला घेऊन शिवसेनेच्यावतीने आज मूक मोर्चा काढला. यानंतर शिवसेना उपजिल्हा प्रमुख बंडू कडू व पदाधिकाऱ्यांनी प्रभारी उपविभागीय अधिकारी मनोहर चव्हाण यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या घटनेत महिलेच्या मृत्यूने कुण्याही व्यक्तीला राग येणे ही नैसर्गिक बाब आहे. यातून शिवसेनेला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप बंडू कडू यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणी फॉरेन्सिक अहवाल येण्यापूर्वी डॉक्टर दाम्पत्यावर महिलेच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करुन अटकेची मागणीही त्यांनी केली.
महिलेचा मृत्यू व दवाखाना तोडफोडप्रकरणी आरोप-प्रत्यारोप
By admin | Published: July 16, 2016 2:24 AM