वर्धा : पैशांच्या कारणातून झालेल्या वादात युवकाने युवतीला रस्त्यात अडवून असभ्य वर्तन करुन विनयभंग केला. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी आरोपी युवकाला बेड्या ठोकल्या. ही घटना येनोरा रस्त्यावर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय तरुणीने आरोपी सूरज पोहणकर (रा. शिरुड) याला काही दिवसांपूर्वी ३० हजार रुपये दिले होते. आरोपीने ते पैसे तरुणीला परत न केल्याने ४ ऑक्टोबर रोजी दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. तेव्हापासून तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले होते.
तरुणी येनोरा रस्त्याने मंदिरात दर्शनासाठी दुचाकीने जात असताना आरोपी सूरज याने तिचा पाठलाग करुन रस्त्यात अडवून तू माझ्याशी बोलत का नाही, तुझ्याशी बोलायचे आहे, असा तगादा लावला. तरुणीने बोलण्यास नकार दिला असता आरोपी सूरजने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन करीत तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तरुणीने याबाबतची तक्रार हिंगणघाट पोलिसात दाखल केली. पोलिसांनी तत्काळ याप्रकरणी आरोपी सूरज याला अटक केल्याची माहिती दिली.