हिंगणघाट : येथील ग्रामीण वीज बिल भरणा केंद्रात तब्बल २० लाख ४४ हजार ३४५ रुपयांची अफरातफर करण्यात आली़ यातील आरोपी अद्यापही मोकाटच आहे़ २० दिवस लोटले असताना पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही, असा आरोप विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेने विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषद केला़यावेळी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश सायंकार, अध्यक्ष अशोक कडू, सचिव मुरलीधर गुल्हाणे, विभागीय अध्यक्ष कमलाकर धोटे व पदाधिकारी हजर होते. कर्मचाऱ्यांकडे जमा झालेली वीज बिलाची रक्कम दररोज नियमितपणे विद्युत मंडळाच्या कार्यालयात भरण्याची जबाबदारी होती; पण सदर कर्मचाऱ्यांनी सलग २० दिवस विद्युत मंडळाच्या कार्यालयात रक्कम जमा केली नाही़ यामुळे २३ मार्च रोजी २० लाख ४४ हजार ३४५ रुपयांची अफरातफर झाल्याचे उघड झाले़ यानंतर २४ मार्च रोजी वीज वितरण कंपनीचे अधिकारी वैद्य व कार्यकारी अभियंत्यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश सायंकार यांच्याविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली. वीज मंडळाशी झालेल्या करारानुसार संपूर्ण आर्थिक जबाबदारी पदाधिकाऱ्यावर आहे. याची माहिती मिळताच सायंकार यांनी पोलीस ठाणे गाठून विद्युत मंडळाचे अधिकारी व पोलीस निरीक्षक नाईक यांच्या समक्ष २० लाख ४४ हजार ३४५ रुपयांचा धनादेश वीज मंडळाचे अधिकारी वैद्य यांच्या स्वाधीन केला; पण त्यानंतर २५ मार्च रोजी सायंकार यांनाच अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला. जामिनावर त्यांची सुटका झाली; पण २० लाख रुपयांची अफरातफर करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याविरूद्ध संस्थेने २४ मार्च रोजी ठाण्यात तक्रार दिली असताना २० दिवस लोटूनही कारवाई केली नाही. २० दिवस वीज बिल भरणा केंद्रातून नियमित रक्कम भरली जात नसताना अधिकाऱ्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना मौखिक वा लेखीही कळविले नाही. पदाधिकाऱ्यांना पूर्वसूचना न देता तक्रार नोंदविली गेली़ या संपूर्ण प्रकरणाची चौकशी गरजेची आहे़(तालुका प्रतिनिधी)
‘त्या’ अफरातफर प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच
By admin | Published: April 19, 2015 1:49 AM