लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अवघ्या राज्याचे लक्ष वेधलेल्या हिंगणघाट येथील प्राध्यापिकेवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याच्या प्रकरणातील आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याला शनिवारी मध्यरात्री १२.१० मिनिटांनी न्यायालयात हजर करण्यात आलं. न्याायालयीन कामकाज पूर्ण होऊन मध्यरात्री २.३० च्या सुमारास त्याची रवानगी वर्धा जिल्हा कारागृहात करण्यात आली. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
हिंगणघाटचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर करावयाचे होते. मात्र संतप्त नागरिकांचा रोष पाहता त्याला शनिवारी मध्यरात्री १२.१० मिनिटांनी सुमारास न्यायालयात हजर केले. गंगाखेड येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश डफळे यांच्या न्यायालयात हे कामकाज चालले. त्यांनी आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानुसार आरोपीला तात्काळ वर्धा येथील कारागृहात पहाटे आणण्यात आले व बंदिस्त करण्यात आले.
या घटनेने नागरिकांत असलेला संताप पाहता, आरोपीला तीनदा वेगवेगळ्या कोठड्यांमध्ये हलविले गेले होते. प्रथम हिंगणघाट, नंतर समुद्रपूर व वर्धा असे त्याला ठेवण्यात आले होते.