वर्धा : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून युवकाची ८० हजार रुपयांनी फसवणूक करून मागील १३ वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देणारा नागपूर येथील आरोपी सनतकुमार वामन सोनी याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बडकसच चौक महाल परिसरातून मोठ्या शिताफीने अटक केली.
देवेंद्र सदाशिव सिरसाम रा. चिंचोली याला आराेपी सनतकुमार साेनी रा. विशालनगर, यवतमाळ आणि महिला आरोपी यांनी १८ जून २००९ मध्ये शिक्षण संस्थेमध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष देऊन दीड लाख रुपयांची मागणी केली होती. महिला आरोपीने त्याच्याकडून ८० हजार रुपये घेऊन नोकरी न लावता त्याची फसवणूक केली होती. याबाबत खरांगणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान महिला आरोपीला अटक करण्यात आली होती. परंतु, सनतकुमार सोनी हा फरार होता. त्याच्याविरुद्ध न्यायदंडाधिकारी, आर्वी यांच्या कोर्टात दोषारोप पत्र न्यायप्रविष्ट करण्यात आले होते. न्यायालयाने गुन्ह्यात निकाल देऊन फरार आरोपी सनतकुमार सोनी हा मिळून आल्यास त्याचे विरुद्ध वेगळे दोषारोप पत्र दाखल करण्याची मुभा तपास अधिकाऱ्यांना राहील, असा आदेश पारित केला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी फरार आराेपींना अटक करण्यासाठी वेगवेगळे शोध पथके तयार करून अटकेची मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार यातील शोध पथकाने आराेपी सनतकुमार याला सापळा रचून नागपूर येथील बडकस चौक, महाल मार्केटमधून २६ जानेवारी रोजी अटक केली. पुढील तपासासाठी त्याला खरांगणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गाेपाल ढाेले, निरंजन वरभे, रणजित काकडे, अभिजित वाघमारे, प्रदीप वाघ, अमोल ढोबाळे, अक्षय राऊत यांनी केली.