वर्धा : अल्पवयीन मुलीला पाहून अश्लील शेरेबाजी करणे चांगलेच महागात पडले असून आरोपी विजय रामदास झाडे (२५) रा. बोरगाव मेघे याला कलम ८ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठविण्यात आली. हा निवाडा तिसरे जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.व्हि. अदोने यांनी दिला. पीडितेला नुकसान भरपाईपोटी दीड हजार रुपये देण्याचेही आदेशीत केले.
आरोपी विजय रामदास झाडे हा पीडिता वास्तव्य करीत असलेल्या परिसरातील रहिवासी आहे. पीडिता शाळेत, शिकवणीसाठी किंवा अन्य कोणत्याही कामानिमित्त घराबाहेर पडली असता आरोपी विजय तिचा पाठलाग करायचा. अश्लील भाषेत शरेबाजी, शिवीगाळ करायचा. पीडितेने वारंवार समजावूनही तो ऐकत नव्हता. पीडिता तिच्या मैत्रीणीसोबत २६ जून २०२२ रोजी हिंगणघाट रस्त्याने जात असताना आरोपी दुचाकीने आला आणि पीडितेचा विनयभंग केला. पीडितेने याबाबतची तक्रार पोलिसात दिली.
याप्रकरणात आरोपीविरुद्ध साक्षपुरावे नोंदवण्याची प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर फरार होता. त्यामुळे न्यायालयाने गैरजमानती वाॅरंट काढून त्याला पोलिसांमार्फत पकडुन आणायचे आदेश दिले. पोलिसांनी अटक केल्यावर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यानंतर आरोपीस कारागृहामार्फत न्यायालयात हजर ठेवून न्याय निर्णय देण्यात आला.
याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक, एस.एन. तकीत यांनी केला. तपासा दरम्यान आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. सरकार तर्फे शासकीय अभियोक्ता गिरीष व्ही. तकवाले यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी देवेंद्र कडू, सुजीत पांडव, यांनी साक्षदारांना हजर करुन मोलाची कामगिरी बजावली. अखेर न्यायाधीशांनी आरोपीस तीन वर्षाच्या सश्रम कारवासाची शिक्षा ठोठावली.
प्रत्यक्षद साक्षीदार झाला फितूर
हा खटला न्यायाधीश अदोने यांच्या न्यायालयात न्यायदानाकरिता आला असता शासनातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, प्रत्यक्षदर्शी साक्षदार हे फितूर झाले. मात्र, न्यायालयाने पीडितेच्या पुराव्यावर विश्वास ठेवून इतर साक्षिदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीस शिक्षा ठोठावली.