अटकेतील आरोपीला खर्रा देणाऱ्या सहकाऱ्याचा केला विरोध आर्वी : न्यायालयात नेत असलेल्या आरोपीला त्याच्या सहकाऱ्याने खर्रा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने त्या सहकाऱ्याला नकार दिल्याने त्याने पोलिसांना धमकी दिली. यावरून पोलिसांनी त्या युवकाला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसावर चाकू हल्ला केला. शेख गुड्डू शेख आसीफअसे हल्ला करणाऱ्या युवकाचे तर विनोद वानखेडे असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना रविवारी दुपारी लाकुडबाजार परिसरात घडली. येथील पोलीस ठाण्याच्या कारागृहातील सात आरोपींना घेऊन जमादार विनोद वानखेडे येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात गेले होते. यावेळी शेख गुड्डू शेख आसीफ न्यायाधीश कक्षाजवळ आला व यातील आरोपीला परवानगी न घेता खर्रा देण्याचा प्रयत्न केला. जमादार वानखेडेने त्याला मनाई केली असता शेख गुड्डू धमकी देत पळ काढला. कालांतराने शेख गुड्डू लाकूडबाजार परिसरात असल्याची माहिती मिळताच वानखेडे एका शिपायासह त्याला पकडण्याकरिता गेले असता त्याने पोलिसावर चाकुने हल्ला चढविला. यात पोलीस कर्मचारी जखमी झाला तरी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३५३, ३३२ तसेच हत्यार कायद्याच्या कलम ३,४ अन्वये गुन्हा दाखल करून अटकेची कार्यवाही केली.(शहर प्रतिनिधी)
पोलिसावर आरोपीचा चाकू हल्ला
By admin | Published: July 18, 2016 12:30 AM