१२० वा जयंती महोत्सव : १९५१ मध्ये पवनार येथून तेलंगना येथील शिवरामपल्ली सर्वोदय संमेलनासाठी रवाना झाले होतेदिलीप चव्हाण सेवाग्रामआचार्य विनोबा भावे यांच्या नावातच त्यांच्या विचार, कार्य व सामाजिक शास्त्राची महानता दिसते. प्रतिभावान विनोबांनी स्वातंत्र्य चळवळ, भूदान यज्ञ, कांचन मुक्तीचा प्रयोग, गोवंश हत्या बंदी व मांस निर्यात बंदीसाठी उपोषण केले. यासाठीचा सत्याग्रह व राज्य शासनाने केलेला कायदा, हा त्यांचा व सत्याग्रहींचा विजय म्हणावा लागेल. त्यांचे जीवनचरित्र आजही प्रासंगिक असून दिशा व प्रेरणा देणारे आहे. शुक्रवारी विनोबा भावे यांचा जयंती महोत्सव साजरा होतोय.विनायक नरहरी भावे यांचा जन्म कोंकणातील गागोदे या लहानग्या खेड्यात ११ सप्टेंबर १८९५ रोजी झाला. घरचे वातावरण अध्यात्मिक आणि धार्मिक असल्याने ब्रह्मचर्याचा संकल्प त्यांनी केला. तरूणपणात पारतंत्र्यात असलेला देश तर दुसरीकडे अध्यात्माची ओढ. यातूनच त्यांनी गृहत्याग केला. काशीमध्ये अध्ययन केले. तेथेच त्यांना गांधीजींचे भाषण ऐकण्याची संधी मिळाली. ते प्रभावित झाले. बापूंसोबत पत्रव्यवहार केल्यानंतर ते १९१६ मध्ये कोचरण आश्रमात गेले आणि तेथीलच झाले. याच ठिकाणी गांधीजींनी त्यांना विनोबा हे नाव दिले. विनोबामधील गुण बापूंनी हेरले. आश्रमातील एक रत्न, असाही बापू त्यांचा उल्लेख करीत. वर्धेत सत्याग्रह आश्रमची स्थापना करण्यात आली. याची जबाबदारी विनोबांवर सोपविण्यात आली. येथूनच त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. कठीण परिश्रम, सखोल अध्ययन, रचनात्मक कार्य, ग्रामसेवेचे शास्त्र त्यांनी निर्माण केले. यातून प्रेरणा घेत सहकारी मनोहर दिवाण यांनी कुष्टरोग्यांसाठी कार्य सुरू केले. ‘महाराष्ट्र धर्म’ या पत्रिकेतून त्यांची साहित्यिक प्रतिभा दिसून आली. संतांचा प्रसाद, मधुकर आदी पुस्तके लोकप्रिय झाले. तुरूंगात असताना गीता प्रवचने लिहिली. पुढे ती २४ भाषेत प्रकाशित झाली. १९३०-३१ मध्ये गिताईची रचना केली. जी महाराष्ट्रात घराघरात पोहोचली. विनोबाजींचे स्वातंत्र्य चळवळीतील कार्य उल्लेखनीय असेच राहिले. १९२३ मध्ये नागपूर झेंडा सत्याग्रहात तुरूंगवास झाला. १९४० मध्ये प्रथम सत्याग्रही म्हणून गांधीजींनी त्यांची निवड करून उत्तराधिकारी घोषित केले. तीन वर्ष भारत छोडो आंदोलनात कारावास झाला. १९३८ मध्ये ते पवनार येथे आले. १९५१ मध्ये पवनार येथून तेलंगना येथे शिवरामपल्ली सर्वोदय संमेलनाला ते रवाना झाले.
आचार्य विनोबांचे पवनार आश्रमातील १३ वर्षे वास्तव्य
By admin | Published: September 11, 2015 2:30 AM