लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणू रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्यात येत असताना काहींकडून या नियमांचे उल्लंघन केल्याचे चित्रही दिसून येत आहे. शहरातील कारला चौक परिसरात मॉर्निंग वॉककरीता गेलेल्या तब्बल १६ व्यक्तींवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण सापडला जरी नसला तरी आरोग्य, पोलीस, महसूल विभागाकडून युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्यात येत आहे. देशात लॉकडाऊन घोषित केल्याने संचारबंदी लागू झाली आहे. शहरात विनाकारण फिरणाऱ्यांना लाठीचा प्रसादही देण्यात येत आहे.मागील तीन ते चार दिवसांपासून मोकाटपणे फिरणाऱ्यांच्या दुचाकी जप्त करीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. पण, दोन दिवसांपासून मॉर्निंग वॉकला जाणाºया व्यक्तींवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. मंगळवारी ८ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली होती. तर बुधवारी पहाटे कारला चौक परिसरात १६ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.रामनगर पोलिसांनी कारला चौकात मॉर्निंग वॉक करीता आलेल्या माधव नवघरे, परवेज खान मोहम्मद भोला खान, प्रमोद हांडे, सचिन चौधरी, गौरव तोमर, मोहन दहारे, प्रविण हांडे, हेमंत खेडकर, बाबाराव म्हेसेकर, गजानन सावरकर, गणेश महल्ले, नितीन मुरडीव, प्रकाश मेश्राम, योगेश कोकाटे, रितेश श्रीवास्तव, प्रशांत मिटकरी यांच्यावर कारवाई करीत जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. संचारबंदीच उल्लंघन करणाºया व्यक्तींवर यापुढेही कारवाई करण्यात येणार असल्याचे ठाणेदार जळक यांनी सांगितले.ड्रोनद्वारा नजरपोलीस प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या जात आहे. परंतु, काही नागरिकांकडून संचारबंदी, जमावबंदी कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. मॉर्निंग वॉककरीता पहोट घराबाहेर निघणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असताना पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. पोलीस विभागाकडून सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांनी स्वावलंबी मैदान, सर्कस मैदान, गोपूरी परिसर, महिलाश्रम परिसर, कारला चौक आदी ठिकाणी ड्रोन कॅमेºयांची मदत घेत मॉर्निंग वॉकला आलेल्या व्यक्तींवर कारवाई केली.नागरिकांनी राज्यातील परिस्थिती गांभीर्याने ओळखावी, जीवनावश्यक सेवा सोडून विनाकारण बाहेर पडणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची आणि वाहनचालकाची गय केली जाणार नाही. याबाबतीत कोणताही सबब चालणार नाही. सकाळी सहा वाजतापासूनच पोलीस बंदोबस्त सुरू असून पोलीस कर्मचारी गस्तीवर आहेत.- पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा.मोकाटपणे फिरणाऱ्यांना आर्वीच्या गांधी चौकात उठबशाची शिक्षादेउरवाडा / आर्वी : कोरना प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत असताना देखील काहींकडून याचे उल्लंघन होत आहे. काही युवक मोकाटपणे फिरून विनाकारण रस्त्याने ये-जा करताना दिसतात. येथील गांधी चौकात कर्तव्यावर असलेल्या गृहरक्षक दलातील महिलेने मोकाटपणे फिरणाऱ्यांना थांबवून त्यांना उठबशा काढण्यास लावल्या. तसेच विनाकारण घराबाहेर न पडण्यास सांगितले.