महावितरणचा धडाका : पथकाच्या धाडीने ग्रामस्थांमध्ये धास्ती आष्टी (श.) : घरगुती वापरासाठी वीज चोरी करणाऱ्यांविरोधात महावितरणच्यावतीने धडक मोहीम राबविण्यात येत आहे. यात तळेगाव, रामदरा, काकडदरा येथील ३२ नागरिकांनी अवैध जोडणी घेत विजेची चोरी केल्याचे निदर्शनास आले. या सर्वांवर कलम १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या करवाईमुळे तालुक्यातील वीज चोरांमध्ये धडकी भरली आहे. विजेची चोरी करणे ही बाब नित्याची झाली ओह. याबाबत विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत ही धडक मोहीम सुरू केली. कार्यकारी अभियंता निलेश गायकवाड, उपकार्यकारी अभियंता आर.एन. महाजन, शरद टेकाडे, जी. बी. नाईक, पी.व्ही. बंगीनवार, आर. डी. अतकरे, ए.आर. काकडे, आर.एम. वेलकर, प्रिया दळवी, पाटील, ठवकर या अभियंत्यांच्या पथकाने तळेगाव सर्कलपासून मोहिमेस प्रारंभ केला. यात हाऊस-टु-हाऊस तपासणी केली. यात तळेगाव, रामदरा, काकडदरा येथे तब्बल ३२ जणांनी विजेची चोरी केल्याचे उघड झाले. या सर्वांवर भादंविच्या कलम १३५ अन्वये गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली. एका व्यक्तीविरूद्ध अनधिकृत वीज वापर केल्याबाबत कलम १२६ अंतर्गत कारवाई करण्यात आली. दरम्यान राबविलेल्या मोहिमेत धनदांडग्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे समोर आले. आष्टी उपविभागातील वीज कर्मचारी आणि तळेगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी मोहिमेला सहकार्य केले. सोबतच विजेची देयके थकित असलेल्या वीज ग्राहकांविरूद्धही कारवाई करण्यात आली. वीज चोरी करणाऱ्या व थकबाकी असलेल्या ग्राहकांविरूद्ध आष्टी तालुक्यात मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता निलेश गायकवाड यांनी दिली.(तालुका प्रतिनिधी) जुन्या मीटरचा केला जातोय गैरवापर वीज वितरण कंपनीने १९९० मध्ये लावलेले मीटर आजही बदलण्यात आलेले नाही. २० टक्के एवढ्या संख्येने जुनेच मीटर असल्याने त्यात हेराफेरी करून विजेची चोरी केली जात आहे. याविरुद्धही वीज वितरण कंपनी कार्यवाही करीत आहे. यावर त्वरित उपाययोजना म्हणून नवीन मीटर बसविण्याची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
धडक मोहिमेत ३२ वीज चोरांवर कारवाई
By admin | Published: January 22, 2017 12:30 AM