लाेकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात पाऊस वेळेवर आल्याने खरीपाच्या लागवडीची लगबग सुरु झाली. सुरुवातीलाच सोयाबीनचे बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी सुरु झाल्यात. यामध्ये कपाशीचाही समावेश असून राज्यभरात बोगस बियाण्यांसंदर्भात तब्बल ३० हजार तक्रारी शासनाला प्राप्त झाल्यात. एकट्या वर्धा जिल्ह्यातच ३२९ तक्रारी असून काही प्रकरणात गुन्हे नोंदविण्यात आले पण, पुढील कारवाई थंडबस्त्यात असल्याने शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला मिळाला नाहीत.राज्यभरात यावर्षी सततचा पाऊस, बोगस बियाणे आणि रोगाचा प्रकोप यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी पेरलेले कपाशी व सोयाबीनचे पेरलेले बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले. बियाण्यांची उगवण क्षमताच कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांनी ३० हजार तक्रारी शासनाला प्राप्त झाल्याचे खुद्द कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांनी स्पष्ट केले आहे. यामध्ये महाबीजसह बावीस कंपन्यांंचा समावेश असल्याचेही निदर्शनास आले आहे. तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभागाकडून कारवाईला गती देत काही ठिकाणी कंपनी व कृषी केंद्रांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. पण, त्यानंतर पुढे कारवाईला थांबा देण्यात आल्याचे दिसून येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा बियाण्यावरील खर्च व्यर्थ गेला असून वर्षभराचे उत्पन्नही गेल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्यभरातील शेतकरी कार्यालयाचे उंबरठे झिजवित असून कागद काळे करुन थकले पण, अद्याप मोबदला मिळाला नाही.
जिल्ह्यात सोयाबीनच्या ५३० तक्रारी खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत ५३० तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ३२९ तक्रारीमध्ये बियाण्यात दोष आढळून आल्याने इंदोरच्या एका कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ११७ शेतकऱ्यांना १८९ बॅग सोयाबीन बियाणे वितरण करून ४ लक्ष ८५ हजार ७५० रुपये नुकसान भरपाई दिल्याची माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली आहे. खरीप हंगामामध्ये बियाणे ४५२, रासायनिक खते ३१५ व कीटकनाशक २६५ कृषी केद्रांची तपासणी केली असता बियाणे ४७, रासायनिक खते १७ व किटकनाशक ६ अशा एकूण ७० कृषी केंद्रांना विक्रीबंदचे आदेश देण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मी ६२ एकरामध्ये सोयाबीनची पेरणी करण्याकरिता ६५ बॅग सोयाबीनची खरेदी केली होती. पेरणीपर्यंत सात लाख रुपयांच्यावर खर्च आला. पण, पेरलेले सोयाबीन उगवलेच नसल्याने शेतात वखरणी करावी लागली. कृषी विभागाकडे तक्रार केल्यानंतर कंपनी आणि कृषी केंद्र संचालकावर गुन्हा दाखल झाला. मात्र, अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. यावर तोडगा निघाला नाही तर दिवाळीनंतर आम्ही सर्व नुकसानग्रस्त शेतकरी आंदोलन करणार आहे.- शीतल चौधरी, शेतकरी, गोविंदपूर ता.हिंगणघाट