९४० पानांचे दोषारोपपत्र : लुटमारीच्या घटनेत केले होते जेरबंद लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : तीन कुख्यात गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामुळे पोलिसांनी नागपूरच्या मोक्का न्यायालयात ९४० पानांचे दोषारोपपत्रही सादर केले आहे. प्रकाश उर्फ विक्की सुरेश झामरे (२२) रा. सिंदी (मेघे) ता. वर्धा, अभिजीत आत्माराम सायरे (२२) रा. जामणी ता. सेलू व प्रकाश उर्फ नागेश सूर्यभान भोयर (२९) रा. खानगाव ता. हिंगणघाट, असे कारवाई प्रस्तावित असलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर आरोपींविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यांत भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रामनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय मगर यांनी सदर आरोपींविरूद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अन्वये कार्यवाही करण्याकरिता कलम वाढीचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र यांच्याकडे सादर केला होता. त्यांच्याच परवानगीने कलमांमध्ये वाढ करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले यांनी पूर्ण केला आहे. त्यांना पोलीस निरीक्षक सतीश खेडेकर यांनी सहकार्य केले. तपासांती तीनही आरोपींविरूद्ध ९४० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या आरोपींविरूद्ध जबरी चोरी, चोरी करताना दुखापत करणे, घरांवर अतिक्रमण करून अश्लील शिविगाळ करणे, जीवे ठार करण्याची धमकी देणे, घातक हत्यारांनी इच्छापूर्वक दुखापत करणे, जीवे ठार करण्याचा प्रयत्न करणे, मालमत्ता नष्ट करण्याच्या उद्देशाने आग लावणे, रस्त्यात अडवून मारहाण करणे आदी प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. १६ जानेवारी रोजी रात्री १०.४५ वाजता नागठाणा चौकातील लुटमार प्रकरणात त्यांना २१ जानेवारी रोजी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मालही जप्त करण्यात आला असून न्यायालयात प्रकरणावर सुनावणी होत आहे.
तीन कुख्यातांवर मोक्कांतर्गत कारवाई
By admin | Published: July 06, 2017 12:59 AM