पोलीस कारवाईनंतर आंदोलन मागे : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ठेवीदारांचाही समावेशवर्धा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकलेल्या रकमा परत करण्याच्या मागणीला घेऊन बुधवारी ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले. हे आंदोलन मोडीत काढत गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास या आंदोलनकर्त्यांना शहर पोलिसांनी अटक करून सुटका केली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान किसान अभियानचे मुख्यप्रेरक अविनाश काकडे व जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांच्या नेतृत्त्वातील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांची भेट घेतली. यावेळी निवेदन सादर करीत जोपर्यंत शासनाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा दिला. यानुसार सदर आंदोलन सुरू करण्यात आले होते.वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य शासनाच्या मार्फत आर्थिक मदत देवून जिल्हा बँकेचे महाराष्ट्र सहकारी बँकेत विलीनीकरण करा व एक लाखावरील रकमेच्या थकबाकीदार कर्जदारांची सक्तीने वसुली करण्याचे आदेश जिल्हा बँकेतील प्रशासनाला देवून अडचणीत सापडलेल्या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याची मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली होती. या आंदोलनात किसान अधिकार अभियानच्या कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले आहे. या सर्व शेतकर्यांना गुरुवारी शहर पोलिसांनी अटक केली. त्यांना शहर ठाण्यात नेण्यात आले. येथे स्थानबद्ध करून सोडण्यात आले. बँकेत रक्कम असलेल्या शेतकर्यांनी व खातेदारांनी किसान अधिकार अभियानच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)
किसान अधिकार अभियानच्या कार्यकर्त्यांना अटक व सुटका
By admin | Published: May 30, 2014 12:17 AM