वर्धा : आरटीईनुसार १५० पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या ६२ पात्र शाळांकरिता उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून समुपदेशन प्रक्रिया गुरूवारी पार पाडण्यात आली़ यात ६२ शाळांना मुख्याध्यापक देण्यात आले आहेत़जिल्ह्यात सध्या २६१ उच्च श्रेणी मुख्याध्यापक कार्यरत आहेत. आरटीईनुसार केवळ २४ शाळा उच्चश्रेणीकरिता पात्र राहणार होत्या; पण १७ मे २०१४ च्या सुधारित आदेशाप्रमाणे ३० सप्टेंबर २०१३ चा पट १५० पेक्षा अधिक असणाऱ्या ६२ शाळा पात्र ठरविण्यात आल्यात़ यात पंचायत समितीनिहाय वर्धा १७, सेलू ४, देवळी ८, आर्वी ४, आष्टी ६, कारंजा (घा़) ४, हिंगणघाट ११ व समुद्रपूर पंचायत समितीच्या ८ शाळा आहे. जात प्रवर्ग आणि नि:समर्थकरिता असलेल्या राखीव जागांच्या समावेशासह ज्येष्ठता यादीनुसार २६१ मधून ६२ उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची निवड करण्यात आली. समायोजन संबंधाने ग्रामविकास विभागाच्या १२/१८ मार्च २०११ च्या शासन निर्णयानुसार पदस्थापना प्रक्रिया घेण्यात आली. सध्या पात्र असणाऱ्या शाळेत कार्यरत ज्येष्ठतेने पात्र १० यूएचएमना त्याच शाळेत पदस्थापना देण्यात आली. यानंतर वास्तव्य सेवा ज्येष्ठता धरून ३७ यूएचएमना कार्यरत पंचायत समितीमध्ये व उर्वरित १५ यूएचएमना दुसऱ्या पंचायत समितीमध्ये पदस्थापना देण्यात आली.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव यांनी सदर समुपदेशन पार पडले. पारदर्शक पद्धतीने समुपदेशन प्रक्रिय पार पाडल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे विजय कोंबे, नरेश गेडे, नरेंद्र गाडेकर, महेंद्र भुते, प्रकाश काळे, अजय बोबडे आदींनी उदय चौधरी, विपुल जाधव, शिक्षणाधिकारी धनराज तेलंग व त्यांच्या सर्व सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आभार मानले. या प्रक्रियेमुळे ६२ शाळांना मुख्याध्यापक लाभलेत़(कार्यालय प्रतिनिधी)
पात्र उच्च श्रेणी मुख्याध्यापकांचे समायोजन
By admin | Published: June 23, 2014 12:16 AM