लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात नगरपालिकेच्यावतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नियंत्रणाखाली अमृत योजनेंतर्गत मलनिस्सारण योजनेचे काम सुरु आहे. या कामाकरिता सिमेंटचे पक्के रस्ते फोडून पाईपलाईन टाकण्यात आल्याने सुरुवातीपासून ही योजना वादग्रस्त ठरली. कंत्राटदाराने मनमर्जीने काम चालविल्याने शहरातील अर्थसंकल्पीय कामे रेंगाळली आहे. याचाच फटका महात्मा गांधी चौक ते बसस्थानकापर्यंतच्या कामाला बसला आहे. त्यामुळे आता मलनिस्सारण योजनेकरिता रस्ता फोडण्याची परवानगी देणार नाही, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने नगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला पत्राव्दारे दिल्या आहे.शहरातील विविध रस्त्यांच्या सिमेंटीकरणासह रुंदिकरणाच्या कामाला गती देण्यात आली आहे. यातील बहूतांश रस्त्यांचे सिमेंटीकरण पूर्ण झाले आहे. हल्ली महात्मा गांधी पुतळा ते बसस्थानकापर्यंतच्या मार्गाचे सिमेेंटीकरण व रुदिकरणाचे काम सुरु आहे. या मार्गावरुन मलनिस्सारणची पाईपालाईन जाणार असल्याने या मार्गावरील मलनिस्सारणचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. महात्मा गांधी पुतळा ते झाशी राणी चौकापर्यंतचे सिमेंटिकरण व रुंदिकरणाच्या कामासह मलनिस्सारणचेही काम पुर्ण झाले आहे. मात्र झाशी राणी चौक ते बजाज चौकापर्यंतच्या मलनिस्सारणच्या कामाला कंत्राटदाराने अद्यापही हात लावला नसल्याने सिमेंटीकरणाचेही काम रखडले आहे. परिणामी नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत असल्याने ओरड होत आहे. याबाबत वांरवार पत्रव्यवहार करुनही दुर्लक्ष करण्यात आल्याने आता या रस्त्याचे काम सुरु करण्यात येत असून मलनिस्सारणाच्या कामासाठी रस्ता फोडण्याची परवानगी मिळणार नाही, असे पत्रातून कळविले आहे. त्यामुळे आता या मार्गावरील मलनिस्सारण योजना रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रस्त्याच्या बांधकामाचा कालावधी संपल्याने वाढली अडचण१६ एप्रिल २०१८ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आयोजित बैठकीत ज्या रस्त्यावर सिमेंटीकरणाचे कामे मंजूर आहे आणि त्याचा करारनामा झाला आहे, ती कामे प्राधान्याने करण्याविषयी सूचना देण्यात आल्या होत्या.परंतू दीड वर्षाचा कालावधी लोटूनही झाशी राणी चौक ते बसस्थानकापर्यंतचे मलनिस्सारणचे काम केले नाही. त्यामुळे करारानुसार कंत्राटदाराचा कालावधीही संपल्याने अडचण वाढली आहे.
मलनिस्सारणमुळे अडली सिमेंटीकरणाची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 11:25 PM
शहरात नगरपालिकेच्यावतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नियंत्रणाखाली अमृत योजनेंतर्गत मलनिस्सारण योजनेचे काम सुरु आहे. या कामाकरिता सिमेंटचे पक्के रस्ते फोडून पाईपलाईन टाकण्यात आल्याने सुरुवातीपासून ही योजना वादग्रस्त ठरली.
ठळक मुद्देआता रस्ता फोडण्यास मनाई : सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले पत्र