लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यात मे महिन्यामध्ये कोरोनाने शिरकाव केला. तरीही जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाने प्रभावी अंमलबजावणी करुन कोरोनाची रुग्णसंख्या मर्यादित ठेवण्यात मोठे यश मिळविले आहे. जिल्ह्यात एकूण १३ रुग्णांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी ६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून पाच रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तेही लवकरच कोरोनामुक्त होणार असल्याचे सांगण्यात आले असून सर्वात कमी रुग्ण असलेला वर्धा हा राज्यातील एकमेव जिल्हा ठरला आहे.एका महिलेचा मृत्यू पश्चात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात पहिल्या रुग्णाची नोंद करण्यात आली. त्यानंतर बाहेर जिल्ह्यातून वर्ध्यात राहायला किंवा उपचाराकरिता आलेल्या व्यक्तींमुळे रुग्णसंख्या ही २६ वर पोहोचली. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील १३ तर बाहेर जिल्ह्यातील १३ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून यामध्ये जिल्ह्यातील २ आणि बाहेर जिल्ह्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. बाहेर जिल्ह्यातील सर्व रुग्ण बरे होवून आपापल्या गावी रवाना करण्यात आले. तर वर्ध्यातील ५ रुग्णांवर सध्या उपचार सुरुआहे. यामध्ये चौघांवर वर्ध्यात तर एकावर नागपूर येथे उपचार सुरु आहे. आताही रुग्ण संख्या वाढू नयेत यासाठी बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांवर प्रशासनाचा वॉच आहे. आलेल्यांना क्वारंटाईन करणे, त्याची माहिती घेणे यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी व आशा सेविका दिवसरात्र कार्यरत आहे.
शिथिलता अन् उपायोजनाहीलॉकडाऊनंतरच्या शिथिलतेच्या तिसऱ्या टप्प्यात जनजीवन पूर्वपदावर आले आहेत. मात्र, जिल्ह्याच्या सीमा बंद असून अंतरजिल्ह्यात दुकाने, उद्योग सुरु केले आहेत. प्रत्येक भागामध्ये नोडल अधिकारी, प्रशासन लक्ष देवून सोशल डिस्टन्सिंगसह इतरही उपाययोजनांच्या अंमलबजावणीकडे लक्ष देवून आहे. मास्कचा वापर, सॅनिटायझरची व्यवस्था न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही केली जात आहे. जिल्हा प्रशासनाने प्रारंभापासूनच प्रभावी अंमलबजावणी केल्याने वर्ध्यातील उपायोजनांची देशपातळीवर दखल घेतल्या गेली. याच उपाययोजनेमुळे कोरोनाच्या लढ्यातही वर्धा महाराष्ट्रात अव्वल राहिला आहे.