लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात सहा व्यक्ती परतले आहेत. या सहा व्यक्तींमध्ये तीन पुरुष तर तीन महिलांचा समावेश असून या सहाही व्यक्तींची आरटीपीसीआर पद्धतीने कोविड चाचणी केली असता त्यांचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. असे असले तरी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना केंद्रस्थानी ठेवून या सहाही व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शिवाय त्यांची वेळोवेळी कोविड टेस्ट केली जाणार असून कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांचे स्वॅब पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. एकूणच विदेशवारी करून जिल्ह्यात परतलेल्या या व्यक्तींवर जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा बारकाईने लक्ष आहे. मुंबई, हैदराबाद अन् दिल्ली होत परतले वर्ध्यात- ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात विदेशवारी करून परतलेल्या प्रत्येक व्यक्तीवर जिल्हा प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत सहा व्यक्ती विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतले असून त्यापैकी तीन व्यक्ती मुंबई, दोन हैदराबाद तर एक दिल्ली येथील विमानतळावर उतरल्यानंतर वर्धा जिल्ह्यात आलेत. असे असले तरी या सर्व व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आहे.- या व्यक्तींवर आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचे लक्ष असून त्यांची विलगीकरण कालावधीत वेळोवेळी कोविड चाचणी केली जाणार आहे. जर कुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास पॉझिटिव्ह व्यक्तीचे स्वॅब ओमायकॉनची शहानिशा करण्यासाठी पुणे येथे पाठविले जाणार आहे.
विदेशवारी करून आलेल्यांत वर्धेतील सर्वाधिक - विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतलेल्यांमध्ये वर्धा शहरातील चार, हिंगणघाट येथील एक तर वर्धा शहराशेजारील नालवाडी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. या सर्व व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असला तरी त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
दोघांनीच घेतली आहे कोविडची व्हॅक्सिन- विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतलेल्या सहा व्यक्तींमध्ये तीन महिला तर तीन पुरुषांचा समावेश आहे. या सहापैकी केवळ दोन व्यक्तींचीच कोविडची प्रतिबंधात्मक लस घेतली असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले आहे.
पाचव्या आणि दहाव्या दिवशी होणार पुन्हा कोविड चाचणी- विदेशवारी करून परतलेल्यांची विलगीकरण कालावधीत पाचव्या दिवशी तसेच दहाव्या दिवशी आरटीपीसीआर पद्धतीने कोविड चाचणी केली जाणार आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्याकडून शासनाच्या सूचनांचे पालन करून घेतले जाणार आहे.