हिंगणघाट : रा. सु. बिडकर महाविद्यालयातील बीएससी प्रथम वर्षाच्या ८४ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांचे स्वीकारलेले शुल्क त्या विद्यार्थ्यांना परत करण्याचे आदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने दिले आहेत. त्यांची प्रवेश प्रक्रिया नव्याने पार पाडण्यासाठी पर्यवेक्षक म्हणून प्रा. ईश्वर सोमनाथे यांची नियुक्ती विद्यापीठाने केली आहे.स्थानिक रा.सु. बिडकर महाविद्यालयातील बीएससी प्रथम वर्षाच्या सन २०१६-१७ या सत्रासाठी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशात अनियमितता झाल्याच्या तक्रारीवरुन डॉ. एस.आर. कोमावार यांच्या अध्यक्षतेखाली त्री सदस्यीय समितीची स्थापना करून चौकशी करण्यात आली होती. या समितीने ३० जून २०१६ ला महाविद्यालयात भेट देवून विद्यार्थी तक्रारकर्ते यांचे म्हणणे ऐकूण कागदपत्राची पाहणी करीत विद्यापीठाला अहवाल सादर केला होता. या समितीच्या अहवालातील शिफारशींवरुन कुलगुरुच्या आदेशाने या महाविद्यालयात २५ जून २०१६ पर्यंत झालेले बीएससी प्रथम वर्षांचे २०१६-१७ या सत्राचे ८४ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याचे तसेच सदर विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेली संपूर्ण रक्कम परत करण्याचे निर्देश सहाय्यक कुलसचिवांनी प्राचार्यांना दिले आहेत. या महाविद्यालयात बीएससी प्रथम वर्षाचे २०१६-१७ या सत्राकरिता नव्याने प्रवेश सुरू करण्याच्या दृष्टीने वेळापत्रक निश्चित करून नियमानुसार प्रवेश शुल्क आकारुन व आरक्षण धोरणाचा अवलंब करून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची सूचना दिली आहे. ही प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाद्वारे नियुक्त पर्यवेक्षक प्रा. ईश्वर सोमनाथे यांच्या मार्फत व देखरेखीखाली पार पाडली जाणार आहे. या प्रवेश प्रक्रियेची पर्यवक्षक प्रा. सोमनाथे यांच्याकडून विद्यापीठाला अहवाल प्राप्त झाल्यानंतरच महाविद्यालयातील बीएससी प्रथम वर्षाचे प्रवेश नियमित करण्यात येणार आहे. येथील आम आदमी पार्टी व नगर विकास सुधार समितीचे मनोज रुपारेल यांनी विद्यापीठाच्या निर्णयाचे स्वागत केले असून नव्याने राबविण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया गुणवत्तेवर आधारित व विद्यापीठाचे नियमानुसार प्रवेश शुल्क घेवून प्रवेश होणार असल्याचे कळविले आहे.(तालुका प्रतिनिधी)तक्रारीवरून एसीबीची कारवाई४या महाविद्यालयात निर्धारीत प्रवेश शुल्काव्यतिरिक्त अधिक रक्कम घेण्यात येत असल्याची तक्रार वर्धेच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई करीत एका प्राध्यापकाला अटक केली होती. त्याच प्राध्यापकाने केलेले हे ८४ प्रवेश आहेत.
‘त्या’८४ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द
By admin | Published: July 19, 2016 2:28 AM