इंटरनेट सेवा ठप्प : भ्रमणध्वनी व दूरध्वनी झाले नाममात्र आर्वी : तालुक्यातील खरांगणा (मो.) येथील दूरध्वनी सेवा मागील पंधरा दिवसांपासून ठप्प आहे. त्यामुळे बीएसएनएलचे दुरध्वनी व भ्रमणधवनी नाममात्र ठरत आहे. याचा परिणाम इंटरनेट सेवेवर झाला असून इंटरनेट बंद असल्याने बँक, पोलीस ठाणे, डाक विभाग तसेच अन्य कार्यालयातील कामकाज प्रभावित झाले आहे. खरांगणा (मो.) येथे पोलीस ठाणे, डाक विभाग, दोन बँकेचे कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय रूग्णालय, महसूल तसेच कृषी मंडळ अधिकारी कार्यालय, वनविभाग अशी कार्यालये आहेत. जवळपास ही सर्वच कार्यालय इंटरनेटने जोडली आहे. त्यामुळे इंटरनेट सेवा सुरळीत ठेवणे निकडीचे झाले आहे. बहुतांश कार्यालयाचे कामकाज आॅनलाईन पद्धतीने होते. शासैइय कार्यालयांसह खासगी कार्यालये व प्रतिष्ठानांमध्ये भारत संचार निगमची दूरध्वनी सेवा आहे. यालाच इंटरनेट जोडण्यात आले आहेत. खरांगणा-मोरांगणा आणि परिसरातील गावात बीएसएनएलची सेवा वापरली जाते. दूरध्वनीसह अनेकांनी बीएसएनएलची भ्रमणध्वनी सेवाही घेतली आहे. मागील पंधरा दिवसांपासून या सेवेत खंड पडला आहे. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पंधरा दिवसांपासून दूरध्वनी तसेच मोबाईल बंद आहेत. दूरध्वनी सेवा बंद असल्याने इंटरनेटही बंद झाले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना संपर्क साधण्यात अडचण येत आहे. व्यत्ययपूर्ण सेवेमुळे ग्राहकांची अडचण झाली आहे. बँक, डाक तसेच अन्य कार्यालयात इंटरनेटची कामे अन्य खासगी कंपन्याचे डोंगल वापरून करण्याचा प्रयत्न केला जातो. पण, माहिती वहन क्षमता कमी असल्याने दहा मिनिटाच्या कामाकरिता किमान तासाभराचा वेळ खर्ची घालावा लागतो. यात कर्मचारी तसेच नागरिकांना मनस्ताप होत आहे. भारत संचार निगमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील तांत्रिक बिघाडाकडे लक्ष देत दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकातून होत आहे. कार्यवाहीकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.(तालुका प्रतिनिधी)
दूरध्वनी सेवा ठप्प असल्याने कार्यालयीन कामकाज प्रभावित
By admin | Published: April 20, 2017 12:52 AM