वर्धा : लोकसभा निवडणुकीसाठी खऱ्या अर्थाने ९ एप्रिलपासून प्रचाराला सुरुवात झाली. तेव्हापासून तब्बल १६ दिवस धडाडलेल्या प्रचारतोफा बुधवारी सायंकाळी ५:०० वाजता शांत होणार आहेत. त्यानंतर बुधवार आणि गुरुवारची रात्र महत्त्वाची ठरणार आहे. अर्थात आता लोकसभा निवडणुकीचे काउंटडाउन सुरू झाले आहे.
विदर्भात पहिल्या टप्प्यात पाच लोकसभा मतदारसंघात मतदान आटोपले. त्यानंतर आता वर्धासह उर्वरित लोकसभा मतदारसंघात येत्या २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या सर्व मतदारसंघात ८ एप्रिल रोजी दुपारी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर रिंगणातील उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले होते. त्यामुळे ९ एप्रिलपासून खऱ्या अर्थाने खुल्या प्रचाराला सुरुवात झाली होती. विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही धूमधडाक्यात प्रचार सुरू केला होता. गावोगावी प्रचार वाहने जात होती. खेडोपाडी धुरळा उडत होता. गेल्या १६ दिवसांपासून सर्वत्र भोंग्यांचे कर्णकर्कश आवाज सुरू होते. मात्र, आता २४ एप्रिल रोजी धडाडणाऱ्या प्रचारतोफा शांत होणार आहेत.
खुला प्रचार बंद झाल्यानंतर उमेदवारांचा मूक प्रचारावर जोर राहणार आहे. बुधवारी सायंकाळपासून मूक प्रचार सुरू होणार आहे. उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांना साकडे घालणार आहेत. बुधवार आणि गुरुवारची रात्रही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या दोन रात्रीतून बरीच ‘खलबते’ होणार आहेत. प्रचार बंद झाल्यानंतरच्या ४८ तासांत बऱ्याच ‘घडामाेडी’ घडण्याची शक्यता आहे. गुप्त बैठकांना उधाण येणार आहे. खेडोपाडी चर्चा सुरू होणार आहे. गल्लोगल्ली ‘कुणाचा जोर’ यावर मंथन होणार आहे. हा ‘जोर’ बघूनच अनेक मतदार मतदान करण्याची शक्यता आहे.
बूथवर पोहोचणार साहित्य अन् रसद
गावोगावच्या बूथवर गुरुवारीच विविध ‘साहित्य’ पोहोचविले जाणार आहे. साहित्यासोबतच कार्यकर्त्यांना ‘चहा-पाण्या’साठी रसदही पुरविली जाणार आहे. गुरुवारची रात्र ‘कत्तल की रात’ ठरणार आहे. सर्वच पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून ही रात्र काढणार आहेत. प्रत्येक बूथवर साहित्य अन् रसद पुरविताना उमेदवारांचीही दमछाक होणार आहे. कुठे ‘रसद’ कमी पडल्यास कार्यकर्ते भडकण्याची शक्यता आहे. त्यांच्या नाराजीचा उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारही ‘दक्ष’ आहेत.