लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : शहरात सन १९७९ मध्ये महापुराचे पाणी जुन्या वस्तीत शिरले होते. यात मोठी हानी झाली होती. या पूर पीडितांना पट्टे वाटप करण्यात तर आले मात्र प्रॉपर्टी कार्ड दिले नव्हते. यासाठी पूर पीडितांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर तब्बल ४३ वर्षांनी प्रॉपर्टी कार्ड देण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत.
हिंगणघाट शहरात १९७९ मध्ये आलेल्या महापुराचे पाणी शहराच्या जुन्या वस्तीत शिरले होते. यात मोठी हानी झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घटनेची दखल घेत पीडित लोकांना हिंगणघाट येते सुनियोजित जागा निर्माण करून वसाहत निर्माण केली होती. अशीच एक वसाहत हिंगणघाट येथे गावठाण नांदगाव (बो) येथे निर्माण केली होती. या वसाहतीत राहणाऱ्या लोकांना सगळ्यांना पट्टे देण्यात आलेले होते. परंतु प्रॉपर्टी कार्ड देण्यात न आल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. यासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी याचा लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे पाठपुरावा करून तब्बल ४३ वर्षांनंतर २६ रोजी हिंगणघाट भूमी अभिलेख कार्यालयाच्या अंतर्गत जमाबंदी कार्यालय पुणे व उपसंचालक, भूमी अभिलेख कार्यालय नागपूर प्रदेश, नागपूर यांच्या आखिव पत्रिका तयार करून देण्याचा निर्णय घेतला. येत्या काही दिवसांतच आमदार समीर कुणावर यांच्या हस्ते मालकी हक्क पत्रिका दिली जाणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
भूमिअभिलेखच्या अधिकाऱ्यांनीही केले सहकार्य गेल्या ४३ वर्षांपासून पूरपीडित बांधव प्रॉर्पटी कार्डसाठी लढा देत होते. वारंवार लोकप्रतिनिधींकडे मागणी करीत होते. अखेर त्यांच्या परिश्रमाला यश आले आहे. नुकसानग्रस्तांनी वेळोवेळी ही बाब आमदारांच्याही लक्षात आणून दिली होती. आता आखिव पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) चे वितरण केले जाणार आहे. वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असणारा प्रश्न मार्गी लागल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये समाधानाचा सूर उमटत आहे. वर्धा येथील भूमी अभिलेख अधीक्षक सुनील बन, हिंगणघाट भूमी अभिलेखचे उपअधीक्षक प्रवीण तांबडे, भूमी अभिलेख कार्यालयातील समस्त कर्मचारी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. आमदारांनी ७९६ लोकांना मालकी हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळणार असल्याचे सांगितले. याबद्दलचे पत्र उपसंचालक, भूमी अभिलेख कार्यालय, नागपूर प्रदेश, नागपूर, यांना २६ सप्टेंबर रोजी प्राप्त झाले आहे. त्यामुळे ही समस्या लवकरच मार्गी लागणार आहे. लाभार्थी या निर्णयामुळे समाधान व्यक्त करीत आहे. त्यांच्या जागेच्या खरेदी, विक्रीचा प्रश्न निकाली निघणार आहे.
८५० जणांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड शहर परिसरातील पूर पीडितांसाठी नांदगाव (बोरगाव) येथे ८५० प्रॉपर्टी कार्ड घेण्याचा निर्णय झाला आहे. भूमी अभिलेख कार्यालयाच्या अंतर्गत आखिव पत्रिका मंजूर करून देण्याचा निर्णय झाला आहे. ८५० पैकी ७९६ रहिवासी व ५४ शासकीय (खुले मैदान, शाळा, मंदिर व अन्य) चा समावेश आहे.