शिक्षकांचे वेतन अफरातफर प्रकरण : दोन महिन्यानंतर कारवाई समुद्रपूर : पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील एप्रिल २०१४ ते मार्च २०१६ या कालावधीमध्ये शिक्षकांच्या वेतनात १५ लाख ८३ हजार २४२ रुपयांची अफरातफर करणारा लिपिक सुयोग सुरेश ठाकरे व त्याचा सहकारी शिपाई अरविंद चंपत इतवारे या दोघांवर समुद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्याच्या या कारवाईला तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लागला.पंचायत समिती समुद्रपूरच्या शिक्षण विभागात शिक्षकांच्या वेतनामध्ये मोठी अफरातफर झाल्याचे मे महिन्यात उघड झाले. यामुळे पंचायत समिती व जि.प.मध्ये चांगलीच खळबळ उडाली. यावर जि.प. चे मुख्य वित्त लेखा अधिकारी नगराळे यांच्यासह पाच अधिकाऱ्यांची समिती नेमून चौकशी सुरू झाली. चौकशीमध्ये कनिष्ठ लिपिक सुयोग ठाकरे याने अफरातफर केल्याचे निष्पन्न झाले; मात्र अजूनपर्यंत प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता. गटविकास अधिकारी विजय लोंढे यांनी पोलीस ठाण्याला बँकेचे स्टेटमेंट देत तक्रार दाखल केली होती; मात्र सोबत आॅडीटर लेखा अंकेक्षकाचा अहवाल नसल्याच्या कारणावरून ठाणेदार चव्हाण यांनी ती तक्रार दाखल करून घेतली नव्हती. आता गटविकास अधिकाऱ्याने सर्व कागदपत्रासह तक्रार केल्याने पोलिसांनी लिपिकासह एका शिपायाविरूद्ध गुन्हा दाखल केला. एका शिपायाचाही समावेशगत दोन महिन्यापूर्वी उघड झालेल्या या घोळात आणखी कोणी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. हा संशय खरा ठरला असून यात कार्यालयाचा शिपाई अरविंद इतवारे याचाही समावेश आहे. त्याच्या खात्यावर त्याने १ लाख ४२ हजार २४२ रुपये वळते केल्याचे आढळून आले.