अधिकारी आलेच नाही : नोटीस आणि दवंडीमुळे ग्रामस्थांना होती पथकाची प्रतीक्षा तळेगाव (टा.) : गावातील एकुर्ली व हिंगणघाट-वायगाव रस्त्याच्या बाजूला अनेकांनी अवैध बांधकाम केले. याच रस्त्याच्या बाजूच्या काही घरांवर दोन वर्षांपूर्वी बांधकाम विभागाने जेसीबी चालवित अतिक्रमण काढले होते. शिल्लक राहिलेले अतिक्रमण बुधवारी काढण्यात येणार होते. संबंधितांना याबाबत नोटीस देत गावात दवंडीही दिली; पण बांधकाम विभागाचे पथक आलेच नाही. परिणामी, अतिक्रमण हटविण्याचा बार फुसकाच ठरला. या रस्त्याचे अनेक वेळा मोजमाप करण्यात आले. यामुळे दोन वर्षांपासून काही अतिक्रमणधारक घरे पडतील, या विवंचनेत आहे. अशातच यावर्षी नव्याने बांधकाम विभागाने अवैधरित्या बांधकाम केलेल्या अतिक्रमण धारकांना एक महिन्यापूर्वी नोटीस दिली. यासाठी शासनाच्या आदेशाद्वारे मंगळवारी ग्रामपंचायतीच्यावतीने दवंडी देण्यात आली. ‘अतिक्रमणाची मोजणी करून सिमांकन करण्यात आले आहे. शासनाच्या जागेवर अतिक्रमण केलेल्यांनी दवंडीची दखल घेत २४ तासांत सिमांकनाप्रमाणे अतिक्रमण काढून टाकावे. अन्यथा १ फेब्रुवारी २०१७ रोजी अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात येईल. यामुळे झालेल्या नुकसानीसाठी शासन जबाबदार राहणार नाही’, असे सांगण्यात आले. यावरून काहींनी दुकानाचे काऊंटर, काहींनी घरे उकलली; पण बुधवारी दिवसभर अतिक्रमण हटविण्यासाठी पथक आले नाही. यामुळे अकारण मनस्ताप सहन करावा लागला.(वार्ताहर) ग्रामस्थांमध्ये होती धास्ती तळेगाव गावातील एकुर्ली रस्त्यावरील अतिक्रमण धारकांना नोटीस देत दवंडी देण्यात आली होती. मंगळवारी दिलेल्या दवंडीमुळे बुधवारी अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही होणार, अशी धास्ती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली होती. परिणामी, अतिक्रमणधारकांनी आपल्या दुकानांचे काऊंटर, काहींनी रस्त्यावर आलेली घरे उकलून ठेवल्याचे दिसून आले. बांधकाम विभागाकडून तत्पूर्वीच अतिक्रमणाची मोजणी करून सिमांकन करून देण्यात आलेले होते. त्यानुसार अतिक्रमण हटविण्याच्या सूचना नोटीसमधून देण्यात आल्या होत्या. असे असले तरी बुधवारी पथकच गावात दाखल न झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.
अखेर अतिक्रमण हटविण्याचा बार ठरला फुसका
By admin | Published: February 02, 2017 12:45 AM