दररोज प्यायची एक लिटर मद्य : बोरगाव (हा.) येथील घटना, करुणाश्रमात झाले उपचार लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : आयुष्य जसे बिघडू शकते तसे ते सुधारूही शकते. त्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते. राणी नावाच्या माकडिणीसाठी हे सूत्र लागू झाले आहे. कौस्तुभ गावंडे यांच्यासारख्या पशुप्रेमीने तिच्या जीवनात बदल घडवून आणला आहे. दररोज एक लिटर दारू पिणारी राणी आता दारूला स्पर्शही करीत नाही. एक माकडीण दारू सोडू शकते तर माणूस का नाही, हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील बोरगाव हातला येथील एका मदाऱ्याने माकडीण पाळली होती. दिवसभर तो खेळ करायचा. स्वत: दिवसभर दारूच्या नशेत राहून राणीलाही दारू पाजायचा. दोन-तीन वर्षांपासून दारू पिणे हा दोघांचाही नित्यक्रम बनला होता. ८-१० महिन्यांपूर्वी वर्धा वन विभागाची नजर या मदारीवर गेली. त्यांनी माकडीणीला ताब्यात घेत वन्यजीव प्रेमी कौस्तुभ गावंडे यांच्याकडे सोपविले. कौस्तुभने पीपल्स फॉर अॅनिमल या संस्थेच्या करुणाश्रमात माकडिणीला ठेवले. राणीने दोन-तीन दिवस भोजनाला स्पर्शही केला नाही. तिला दारूचे व्यसन लागल्याची माहिती आश्रमवासीयांना कळली. या आश्रमाचे पशुचिकित्सा अधिकारी संदीप जोगी यांना राणीची दारू कशी सोडवायची हा प्रश्न पडला होता. हळूहळू कमी केला डोज कौस्तुभ आणि डॉ. जोगी यांनी राणीची दारू एकदम न सोडता तिचे प्रमाण हळूहळू कमी केले. सहा महिन्यांत दारू कमी कमी करीत पूर्णपणे बंद करण्यात आली. या काळात डॉक्टरांची तिच्या हालचालीवर पूर्ण नजर असायची. करुणाश्रमात राणीची राजा नावाच्या माकडाशी ओळख झाली. तिला आता पिलूही झाले आहे. हे पिलू थोडे मोठे झाल्यानंतर त्याला रामटेकच्या जंगलात सोडले जाईल,असे कौस्तुभ यांनी सांगितले.
अखेर व्यसनाधीन ‘राणी’ने सोडली दारू
By admin | Published: June 17, 2017 12:57 AM