१० वर्षांनी तोडगा निघाला : नागरी सुविधांसाठी करावा लागला संघर्षवर्धा : नगर परिषद व ग्रामपंचायतीत असलेल्या हद्दीच्या वादावरून बेवारस ठरलेल्या तब्बल २७८ घरांना कुठल्याही नागरी सुविधा मिळत नव्हत्या. यामुळे या भागतील नागरिकांनी अनेकवेळा आंदोलन केली, निवेदने दिली. त्यांनी उभारलेल्या या लढ्याला अखेर १० वर्षांनी यश आले. या प्रकरणात जिल्हा परिषदेने हस्तक्षेप करून ही संपूर्ण घरे सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीच्या हद्दीत समाविष्ट करण्याचे आदेश दिले. यामुळे सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीच्यावतीने या घरांचा सर्व्हे करणे सुरू झाले आहे. येथील नगर परिषेद हद्दीतील संत तुकाराम वॉर्ड क्रमांक १९ मध्ये असलेले २७८ घरे १० वर्षांपूर्वी नगर पालिका प्रशासनाने आपल्या हद्दीत नसल्याचे म्हणत त्यांना उल्लेख हटवित ती घरे सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याचे घोषित केले होते. यावर सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीने ही घरे आमच्या हद्दीत नसल्याचे स्पष्ट केल्याने या घरमालकांना आपण बेवारस असल्याची अनुभूती येत होती. ग्रामपंचायत आणि नगर परिषद क्षेत्रात ही घरे नसल्याने त्यांना नागरी सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ आली होती. नाली सफाई, रस्ते दुरूस्ती, मालमत्तेची खरेदी विक्री, गहाण, कर्ज आदी सुविधांपासून या भागातील नागरिक दूर होते. कुठल्याही नागरी सुविधा नसल्याने या समस्यांकरिता नागरिकांनी युवा परिर्वतन की आवाज या संघटनेशी संपर्क करून आंदोलन सुरू केले. प्रशासनाशी चर्चा केली. नगर परिषद, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद प्रशासनाशी संघटनेच्या सदस्यांनी वारंवार जावून चर्चा केली. पाठपुरावा केला. हा पाठपुरावा सुरू असताना या २७८ घरांची यादी ग्रामपंचायत प्रशासनाने गहाळ केल्याचे उघड झाले. त्यामुळे या भागातील नागरिकांना न्याय मिळेल याची खात्री कमी होती, म्हणून संघटनेनी रक्तदान आंदोलन करून प्रशासनाला चेतावनी दिली. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे यांनी महिनाभरात प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता ही घरे सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीच्या हद्दीतच असल्याचे समोर आले. यामुळे त्यांनी अखेर निर्णय घेत ही घरे ग्रामपंचायतीत समाविष्ट करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांच्या या सूचनेनुसार ही घरे आता ग्रामपंचायत प्रशासनाने आपल्या हद्दीत समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. ही समस्या सोडविण्याकरिता युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे निहाल पांडे, चंद्रशेखर इंगोले, स्वप्नील घुमे, पंकज गणवरे, अमोल देऊळकर, राम आसटकर, विठ्ठल राऊत, अशोक भोयर, गुलाब बोकडे, दाते, अक्षय बाळसराफ, सोनू दाते, अभिषेक भोयर, मयूर पापडकर, निखील आंबुलकर यांनी रक्तदान आंदोलन केले होते.(प्रतिनिधी) मतदानाच्या हक्काकरिता करावी लागणार प्रतीक्षा नगर परिषद आणि ग्रामपंचायत हद्दीत नसलेली घरे आता ग्रामपंचायत हद्दीत आली आहेत. या भागातील नागरिकांची नावे लोकसभा आणि विधानसभेकरिता असलेल्या मतदार यादीत आहेत; मात्र ग्रामपंचायत आणि नगरपरिषद हद्दीतील यादीत त्यांचा समावेश नाही. यामुळे येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकरिता त्यांना मतदान करणे शक्य नसल्याची माहिती तहसील कार्यालयातून मिळाली आहे. यामुळे मतदानाकरिता त्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अखेर ‘ती’ २७८ घरे सिंदी ग्रा.पं. हद्दीत
By admin | Published: January 17, 2017 1:03 AM