लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : मागील साडेपाच वर्षांपासून शेती सात-बारा व मोजणीच्या प्रतीक्षेत असलेल्या वायगाव (हळद्या) येथील प्रेमदास सूर्यवंशी या ६५ वर्षीय शेतकऱ्याने भूमापन विभागाच्या प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला वैतागून तहसील कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यांच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद परिसरातून मिळाला. चौथ्या दिवशी भूमापन विभागाने दखल घेत तहसीलदार रवी रणवीर, नायब तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, उपभूमीअभिलेख अधिकारी अनिल काळपांडे यांच्या उपस्थितीत न्याय देण्याचे आश्वासन दिल्याने उपोषणाची सांगता करण्यात आली.शेतकरी प्रेमदास सूर्यवंशी यांची वायगाव (हळद्या) शेत शिवारात विक्रीपत्रानुसार ३ हेक्टर ६० आर. इतकी होती. मात्र, भूमापन विभागाच्या रेकॉर्डवर २ हेक्टर १७ आर. दाखविण्यात आली. प्रेमदास यांचे वडील सिब्बल सूर्यवंशी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने निकाल देत ही जमीन ३ हेक्टर ६० मंजूर केली होती. या निकालाची प्रत तहसीलदार, भूमी अभिलेख कार्यालयाला देण्यात आली. मात्र, त्यांनी यात कोणतीही दुरुस्ती करून दिली नाही. अशातच सिब्बल यांचा मुत्यु झाला.प्रेमदास मोजणीचे रीतसर पैसे भरण्यास गेले; मात्र त्यांना वेळोवेळी परतीच्या पावलाने यावे लागले. साडेपाच वर्षांपासून भूमापन विभागाकडे दुरुस्तीची मागणी करूनही दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्याने २ आॅगस्टपासून तहसीलसमोर बेमुदत उपोषण सुरू केले. गुरुवारी चौथ्या दिवशी दस्तावेजाप्रमाणे शेताची मोजणी करून देण्याचे लेखी स्वरूपात आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्याने उपोषण मागे घेतले.
आश्वासनानंतर शेतकऱ्याने आंदोलन घेतले मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 11:54 PM
मागील साडेपाच वर्षांपासून शेती सात-बारा व मोजणीच्या प्रतीक्षेत असलेल्या वायगाव (हळद्या) येथील प्रेमदास सूर्यवंशी या ६५ वर्षीय शेतकऱ्याने भूमापन विभागाच्या प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला वैतागून तहसील कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते.
ठळक मुद्देसाडेपाच वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली