‘जान्हवी’नंतर ‘यश’ची झाली घरवापसी; आणखी चौघांना मायदेशी परतण्याची ओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2022 01:54 PM2022-03-03T13:54:11+5:302022-03-03T14:01:31+5:30
मंगळवारी रात्रीला हिंगणघाट येथील यश विनोद मोटवानी याची घर वापसी झाली आहे. असे असले तरी अजूनही चार व्यक्तींची घरवापसी होणे बाकी असून, हे चारही व्यक्ती त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि त्यांचे कुटुंबीय जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे.
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या सहा व्यक्ती शिक्षणासाठी युक्रेनमध्ये होत्या. यापैकी सेलूची जान्हवी राहुल त्रिवेदी ही रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध पेटण्यापूर्वीच तिच्या मूळगावी परतली. तर, मंगळवारी रात्रीला हिंगणघाट येथील यश विनोद मोटवानी याची घर वापसी झाली आहे. असे असले तरी अजूनही चार व्यक्तींची घरवापसी होणे बाकी असून, हे चारही व्यक्ती त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि त्यांचे कुटुंबीय जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे.
सेलू येथील जान्हवी आणि हिंगणघाट येथील यश हे दोघे सुखरूप वर्धा जिल्ह्यात परतले असले, तरी मूळची वर्धा तालुक्यातील पुलई येथील पायल दिलीप तिनघसे, पुलगावचा समीरण चंद्रशेखर काळे, वर्धा शहरातील साई मंदिर भागातील मूळ रहिवासी लविशा अनिल वलिच्छा आणि आर्वी येथील प्रणय सुरेश ताजणे हा अजूनही युक्रेनमध्ये अडकला आहे. वडिलांनी दिलेल्या हिंमतीच्या जोरावर समीरण काळे याने युक्रेन-रोमानियाची बॉर्डर पार केली आहे. तर, उर्वरित तरुण-तरुणीही सध्या याच बॉर्डरवर असल्याचे आणि ते लवकरच बॉर्डर पार करून रोमानियात दाखल होणार असल्याचे त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले आहे.
यशने एसडीएमला सांगितली आपबीती
हिंगणघाट येथील यश मोटवाणी हा सुखरूप आपल्या घरी परतल्याची माहिती मिळताच बुधवारी हिंगणघाट येथील उपविभागीय महसूल अधिकारी शिल्पा सोनाये यांनी स्वत: यशच्या घरी जात यशशी संवाद साधला. मोटवाणी कुटुंबीयांशी साधलेल्या तासभराच्या संवादात यश याने आपबीतीच सांगितली. युक्रेनचे सैनिक रोमानियाच्या बॉर्डरवर गोंधळलेल्या नागरिकांना शांत करण्यासाठी वेळोवेळी बळाचा वापर करीत असल्याचे आणि आपल्याही बॅगला बंदूकधारी युक्रेनच्या एका सैनिकाने बंदुकीने धक्का दिल्याचे यशने सांगितले.