लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना सहन करावा लागत आहे. कधी नव्हे, अशा भीषण जलसंकटाला उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना सामोरे जावे लागले. यंदा समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज सुरुवातीला हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता. परंतु, पावसाळ्याचा एक महिना लोटूनही दमदार पाऊस अजूनही जिल्ह्यात झालेला नाही. त्यामुळे जलाशयांच्या पाणी पातळीतही वाढ झालेली नसून पुढेही अशीच परिस्थिती राहिल्यास विदारक परिस्थितीलाच वर्ध्याकरांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.प्राप्त माहितीनुसार, सध्यास्थितीत बोर प्रकल्पात १०.२६ टक्के, निम्न वर्धा प्रकल्पात ४.०५ टक्के, पोथरा प्रकल्पात २२.३६ टक्के, डोंगरगाव प्रकल्पात १३.६४ टक्के, लाल नाला प्रकल्पात ४४.४९ टक्के, वर्धा कार नदी प्रकल्पात ३३.३३ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. तर वर्धा शहरासह शहराशेजारील १३ गावांची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम, मदन उन्नई धरण, मदन प्रकल्प, सुकळी लघु प्रकल्प तर पुलगावकरांसाठी फायद्याचा ठरणाºया पंचधारा प्रकल्पातील उपयुक्त जलसाठाच संपला असून या पाचही जलाशयाची पाणी पातळी सध्या मृत जलसाठ्यावर आली आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी वर्धा जिल्ह्यातील याच अकरा जलाशयांत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तब्बल २८.५६ टक्के उपयुक्त जलसाठा होता; पण सध्यास्थितीत याच अकरा जलाशयांत केवळ ९.४४ टक्केच उपयुक्त जलसाठा शिल्लक असल्याचे वास्तव आहे. येत्या काही दिवसात वर्धा जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यास घागर-घागर पाण्यासाठी नागरिकांची भटकंतीच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करणे गरजेचे आहे.जिल्ह्यात १८.१५ टक्के पाऊसयेत्या काही दिवसात वर्धा जिल्ह्यात दमदार पाऊस होईल, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. परंतु, मागील एक महिन्याचा विचार केल्यास आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात केवळ १८.१५ टक्केच पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत झालेले पर्जन्यमान कमी असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातील वर्धा तालुक्यात आतापर्यंत ११५.३० मि.मी., सेलू २०४.०० मि.मी., देवळी १५४.८० मि.मी., हिंगणघाट १८८.६७ मि.मी., समुद्रपूर १९६.३४ मि.मी., आर्वी १३१.८० मि.मी., आष्टी (श.) १७३.२४ मि.मी. आणि कारंजा (घा.) तालुक्यात १७२.८१ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.दमदार पाऊस येत्या काही दिवसात न झाल्यास भीषण जलसंकटाला वर्धा शहरासह परिसरातील नागरिकांना आणि जिल्ह्यातील विविध गावांमधील ग्रामस्थांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे अनेकजण ‘दमदार पाऊस येऊ दे गा देवा’ असे ईश्वरचरणी साकडे घालताना दिसून येतात. एकूणच दमदार पावसाची नागरिकांना प्रतीक्षा आहे.
महिना लोटूनही जलाशयात ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 10:14 PM
मागील दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना सहन करावा लागत आहे. कधी नव्हे, अशा भीषण जलसंकटाला उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना सामोरे जावे लागले. यंदा समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज सुरुवातीला हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता.
ठळक मुद्देदमदार पावसाची प्रतीक्षा : अकरा जलाशयात केवळ ९.४४ टक्केच उपयुक्त जलसाठा