लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक भवन्स लॉयड्स विद्यानिकेतनचा प्रतीक किशोर भूत याचे पुर्नपरिक्षणात सुमारे दीड टक्के गुण वाढले. यामुळे तो आता जिल्ह्यात नव्हे तर मध्य भारतातून पहिला ठरला आहे. शिवाय केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) मध्ये वाणिज्य शाखेत राज्यातून पहिला ठरला आहे.सीबीएसई बारावीत प्रतीकला ९७ टक्के गुण मिळाले होते. त्या आधारे त्याने जिल्ह्यात प्रथम स्थान प्राप्त केले होत; पण त्याला यापेक्षाही जास्त गुण मिळणार असल्याचा आत्मविश्वास होता. त्यामुळे त्याने इंग्रजी, बिजनेस स्टडी आणि अकांऊटंसी या विषय पुर्नपरिक्षण व्हावे यासाठी बोर्डाकडे रितसर आवेदन केले. त्या पुर्नपरिक्षणाचा अहवाल नुकताच प्राप्त झाला. यात इंग्रजी विषयात ३ गुण, बिजनेस स्टडी ३ गुण तर अकाऊंटंसीमध्ये १ गुणाची वाढ झाली. यात त्याच्या गुणांची टक्केवारी ९८.४ टक्के झाली. या आधारे तो मध्य भारतातील सीबीएसईच्या सर्व शाळांमधून पहिला तर वाणिज्य शाखेतून राज्यात प्रथम आला आहे. प्रतीक येथील उद्योजक विश्वनाथ भूत यांचा नातू आहे. तर किशोर व प्रीती भूत यांचा मुलगा आहे. त्याची लहान बहिण गौरी नवव्या वर्गात आहे. दररोज ६ ते ७ तास अभ्यास आणि शाळेच्या प्राचार्य किर्ती मिश्रा, शिक्षक स्वप्नील बिसानी व नंदकिशोर शर्मा यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन याला त्याने आपल्या यशाचे श्रेय दिले आहे. भविष्यात सनदी लेखापाल होण्याचे स्वप्न असल्याचे लोकमतशी बोलताना त्याने सांगितले. विशेष म्हणजे पुर्नपरिक्षणात सुमारे दीड टक्का गुण वाढल्याने आता प्रतीकला देशातील नामांकित महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार आहे. त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पुनर्परीक्षणानंतर प्रतीक भूत ठरला मध्य भारतातून प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:16 AM