रोहणा (वर्धा) : मुलाचे दहावीचे पेपर सुरू असतानाच वडिलांचे निधन झाले. १५ रोजी गणिताचा पेपर होता. मात्र, वडिलांचे पार्थिव घरी असतानादेखील मुलगा कुणाल याने परीक्षा केंद्रावर जात गणिताचा पेपर दिला. पेपर सोडवून आल्यानंतर त्याने वडिलांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. या घटनेने रोहणा गावात शोकाकूल वातावरण पसरले होते.
रोहणा येथील रहिवासी प्रमोद सुदर्शन कुडमेथी (५५) यांचे दीर्घ आजाराने बुधवार, १५ रोजी निधन झाले. त्यांचा मुलगा कुणाल हा दहावीला शिक्षण घेत असून, त्याची बोर्डाची परीक्षा सुरू आहे. १५ रोजी त्याचा गणित विषयाचा पेपर होता. एकीकडे वडिलांच्या निधनाचे दु:ख आणि दुसरीकडे भविष्याची चिंता त्याला सतावत होती. मोठा पेच कुणालसमोर निर्माण झाला होता. अखेर कुणालने जड अंत:करणाने रोहणा येथील परीक्षा केंद्रावर जात गणिताचा पेपर दिला.
विशेष म्हणजे त्याची बहीण गायत्री ही बीए प्रथम वर्षाला शिकत असून, तिचीही वर्ध्याला परीक्षा होती. पण, ती परीक्षेला जाऊ शकली नाही. कुणालने गणिताचा पेपर सोडवून येत वडिलांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. मृत प्रमोद कुडमेथी यांच्या पश्चात पत्नी, आई, सासू, मुलगा, मुलगी असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलांच्या परीक्षा काळात वडिलांचे छत्र हरपल्याने रोहणा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.