रवींद्र चांदेकर लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गेल्या दहा वर्षांपासून जिल्ह्यात मंत्रिपदाचा दुष्काळ होता. यावेळी भाजपने जिल्ह्याला राज्यमंत्रिपद बहाल करून हा दुष्काळ संपविला. वर्धेचे आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या रूपाने जिल्ह्याला तब्बल दहा वर्षांनंतर राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले.
विधानसभा निवडणुकीत डॉ. पंकज भोयर यांनी विकासकामांच्या जोरावर तिसऱ्यांदा विजय खेचून आणला. डॉ. भोयर यांनी विजयाची हॅट् ट्रिक साधली होती. दोन लाख ९४ हजार ७५१ मतदारांपैकी ९२ हजार ६७ मतदारांनी त्यांच्या बाजूने कौल दिला होता. याशिवाय हिंगणघाट, देवळी आणि आर्वीतूनही भाजपचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे यंदा जिल्ह्याचा मंत्रिपदाचा दुष्काळ संपेल, अशी अपेक्षा होती. आता डॉ. भोयर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने तब्बल दहा वर्षांनंतर जिल्ह्याचा मंत्रिपदाचा दुष्काळ संपला आहे.
देवळीचे तत्कालीन आमदार रणजित कांबळे यांच्या रूपाने जिल्ह्याला २०१४ पर्यंत मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. कांबळे २००४ ते २००८ पर्यंत ग्रामीण विकास, आरोग्य कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा राज्यमंत्री होते. नंतर पुन्हा ते २००९ ते २०१० पर्यंत विविध खात्यांचे राज्यमंत्री होते. त्यानंतर ते २०१० ते २०१४ पर्यंत सार्वजनिक बांधकाम, राज्य रस्ते विकास, पर्यटन, अन्न व औषध प्रशासन, पाणीपुरवठा राज्यमंत्री होते. २०१४ मध्ये राज्यात सत्तांतर होऊन भाजप-शिवसेनेचे सरकार आले होते. तेव्हापासून जिल्हा मंत्रिपदापासून वंचित होता. आता तब्बल दहा वर्षानंतर डॉ. पंकज भोयर यांच्या रुपाने जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले आहे.
डॉ. पंकज भोयर यांचा परिचय
- पूर्ण नाव : डॉ. पंकज कांचनताई राजेश भोयर
- जन्म तारीख: ५ जानेवारी १९७७
- शिक्षण: बी.एससी., एम.ए. अर्थशास्त्र, पीएच.डी.
- राजकीय कारकीर्द : २०१४ पासून सतत आमदार. तत्पूर्वी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष खेळ नागपूर विद्यापीठाचे हँडबॉलमध्ये राष्ट्रीयस्तरावर प्रतिनिधित्व. हँडबॉलमध्ये विद्यापीठ कलर होल्डर
युवक काँग्रेसमधून राजकीय सुरुवात डॉ. पंकज भोयर यांनी नागपूर विद्यापीठ अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थी विभाग परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. त्यांची खरी राजकीय सुरुवात युवक काँग्रेसच्या माध्यमातून झाली. तत्पूर्वी त्यांनी १९९९ मध्ये राजकीय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. २००२ मध्ये जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. नंतर त्यांनी २००५ मध्ये दांडी मार्चमध्ये सहभाग घेतला. २००६ मध्ये प्रेरणा यात्रेत ते सहभागी झाले होते. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर ते माजी मंत्री दत्ता मेघे, सागर मेघे यांच्यासह भाजपमध्ये दाखल झाले. २०१४ मध्ये त्यांना प्रथम भाजपने वर्धेतून विधानसभेची उमेदवारी दिली. पहिल्याच प्रयत्नात ते निवडून आले. तेव्हापासून सतत तीनदा ते आमदार म्हणून विजयी झाले आहे. आता ते आमदाराचे 'नामदार' झाले आहे.
आईच्या जन्मदिनी आमदारकी, वडिलांच्या जन्मदिनी मंत्रिपद विधानसभा निवडणुकीचा २३ नोव्हेंबरला निकाल लागला. त्या दिवशी डॉ. पंकज भोयर यांच्या मातोश्री कांचन राजेश भोयर यांचा वाढदिवस होता. त्याच दिवशी डॉ. पंकज भोयर यांना तिसऱ्यांदा आमदारकी मिळाली होती. मतमोजणीच्या दिवशी सकाळी डॉ. पंकज यांनी धर्मपली शीतल यांच्यासह आईला शुभेच्छा दिल्यानंतर आईने विजयी भवचा आशीर्वाद दिला होता. योगायोगाने रविवार, १५ डिसेंबरला डॉ. पंकज यांचे पिताश्री डॉ. राजेश भोयर यांचा वाढदिवस आहे. डॉ. पंकज यांनी सकाळी 'बाबां'ना शुभेच्छा दिल्यानंतर त्यांचा फोन खणाणला. पलीकडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना 'मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सायंकाळी ४ वाजता नागपूरच्या राजभवनात पोहोचा', असा निरोप दिला. आईच्या जन्मदिनी विजय आणि वडिलांच्या जन्मदिनी मंत्रिपद, असा दुग्धशर्करा योग यामुळे जुळून आला.
शहरात एकच जल्लोष, आता आगमनाची प्रतीक्षा आमदार डॉ. पंकज भोयर यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी रविवारी सकाळी फोन आल्याची वार्ता शहरभर पसरताच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी झाली. त्यांचा फोनही सारखा खणाणू लागला. या धबडग्यातच ते कुटुंबासह मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी रवाना झाला. तेथे ४:३० वाजता मंत्रिपदाची शपथ घेताच जिल्ह्यासह सोशालीस्ट चौकात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला.
पक्षाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही "पक्षाने राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवून माझ्यावर मोठा विश्वास टाकला आहे. पक्षाच्या आणि मतदारांच्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. राज्यमंत्रिपदाची जबाबदारी चोख पार पाडून राज्यातील जनतेपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासोबतच त्यांच्या कल्याणासाठी सतत कार्यरत राहू. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा आशीर्वाद होता. त्यामुळेच ही सुवर्ण संधी मिळाली आहे. जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू." - डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री म.रा.