रोहणा (वर्धा) : खाते क्रमांकात झालेल्या एका शून्याच्या चुकीमुळे महिला ग्राहकाचे चक्क १ लाख ९० हजार रुपये बँकेतच अडकले होते. मात्र, अडीच महिन्यांनंतर बँक प्रशासनाने त्यांच्या खात्यात सदर रक्कम परत जमा केल्याने त्यांना दिलासा मिळाला.
३० डिसेंबर २०२१ मध्ये वर्ध्यातील नंदा ठाकरे या महिलेने महाराष्ट्र बँक, शाखा गांधीनगर येथील खात्यातून १ लाख ९० हजार रुपये नेफ्टद्वारा रोहणा येथील बँक ऑफ इंडिया शाखेत पाठविले. वर्धा येथील बँकेत पुढे काम नसल्याने त्यांनी ते खाते बंद केले. पाठविलेली रक्कम ८ दिवस होऊनही रोहणा येथील खात्यात जमा न झाल्याने रोहणा येथील खातेधारक नीलेश राऊत यांनी रोहणा येथील बँक वयवस्थापकांशी संपर्क केला. तेव्हा नेफ्ट करताना खाते क्रमांकात एक शून्य कमी टाकल्याने आलेली रक्कम जमा न होता महाराष्ट्र बँक वर्धा येथे परत गेल्याचे सांगण्यात आले.
वर्धा बँकेत चौकशी केली असता खाते बंद केल्याने ती रक्कम परत न येता ऑनलाइन सिस्टममध्ये असल्याचे सांगितले. दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही रक्कम जमा झालेली नव्हती. ही बाब नीलेश राऊत यांनी तंटामुक्ती अध्यक्ष फनिंद्र रघाटाटे यांना सांगितली. त्यांनी लगेच रोहणा येथील महाराष्ट्र बँक, वर्धा येथील बँक ऑफ इंडियाचे झोनल ऑफिस, अग्रणी बँकचे व्यवस्थापक लहाने यांची भेट घेतली. भेटीत बँकेतील सर्वच अधिकाऱ्यांनी परस्पर फोनद्वारा संपर्क करून ८ दिवसांत रक्कम जमा होण्याचे आश्वासन दिले आणि नीलेश राऊत यांच्या खात्यात १.९० लाखाची रक्कम जमा झाली. अडीच महिन्यांपासून तणावात असलेल्या खातेदाराच्या जीवात जीव आला.