लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कारोना काळातील शिथिलतेनंतरचा नागरिकांचा स्वैराचार आता चांगलाच अंगलट आला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने पुन्हा संचारबंदीचे नवे संकट उभे ठाकले आहे. आधीच कोरोनाच्या महामारीतून सावरले नसताना पुन्हा लॉकडाऊन सर्वांचा पोटमारा करणारे ठरणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन कुणालाही परवडणारे नसल्याने नागरिकांनी आता सजग होऊन मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, हा मुख्य पर्याय ठरणार आहे.कोरोनाकाळात वर्धाकरांनी प्रशासनालाही उत्तम साथ दिल्याने जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले होते. परंतु नंतरच्या काळात प्रशासनाकडूनही मोकळीक मिळाल्याने नागरिकांनी नियम धाब्यावर बसवत बेजबाबदारपणे वागणे सुरू केले. ना सोशल डिस्टन्सिंग, ना मास्क, बाजारात अलोट गर्दी, सार्वजनिक कार्यक्रमाचा धडाका, विवाह सोहळ्यांचीही धामधूम, आदींमुळे कोरोनाचा पुन्हा विस्फोट झाला. त्यामुळे यावर नियंत्रण मिळविण्याकरिता जिल्हा प्रशासनाने अॅक्शन मोडवर कामाला सुरुवात केली. ३६ तासांची संचारबंदी लागू करून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. विवाह सोहळ्यातही २० व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आल्याने पुन्हा तेच दिवस येण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे लहान-मोठ्या व्यावसायिकांसमोरही संकट उभे ठाकले आहे. आता दुसरा लॉकडाऊन टाळायचा असेल तर नागरिकांनीच काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे आता नागरिकांना पुन्हा लाॅकडाऊन हवा, की कामकाजात शिथिलता, याचा विचार नागरिकांनाच करावा लागणार आहेत.
धोका वाढतोय, सावधगिरी बाळगा शिथिलतेनंतर नागरिकांनी नियमांना फाटा दिल्यामुळे आता फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. या आठवड्यात रुग्णसंख्या वाढताना दिसताच जिल्हा प्रशासनाकडून वर्धा, हिंगणघाट व देवळी या तीन तालुक्यांमध्ये कोरोनाचे २७ हॉटस्पॉट तयार केले असून संचारबंदी लागू केली आहे. सोबतच पुन्हा कोरोनाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे. नागरिकांनी आता लागलीच धोका ओळखून कोरोनावर मात करण्याकरिता सहकार्य करण्याची गरज आहे.
जिवापेक्षा नुकसान महत्त्वाचे नाही. आता या दुसऱ्या लाटेमध्ये घरच्या घरातच कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. बाजारातील गर्दी वाढायला लागली असून सांगूनही ग्राहक ऐकायला तयार नाहीत. शासकीय यंत्रणाही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आणि व्यापारी, व्यावसायिकांचे नुकसान टाळण्यासाठीच उपाययोजना करीत आहे. पण, नागरिकांना त्याचे महत्त्व कळत नसल्याने लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. महामारी टाळण्यासाठी लॉकडाऊनची गरज असेल तो करायलाच पाहिजे. - शालिग्राम टिबडीवाल, सदस्य, कापड व्यावसायिक संघटना
उद्योग, व्यवसाय संघटनांचे प्रतिनिधी म्हणतातआधीच कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे लहान-मोठे उद्योग ऑक्सिजनवर आले आहेत. मालाला उठाव नाही. त्यातच कच्च्या मालाचे भावही गगनाला भिडले आहे. त्यामुळे उद्योगमालकांची चांगलीच अडचण होत आहे. अद्यापही शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नसल्याने मोठा फटका सहन करून रोजगाराकरिता उद्योग सुरू केले. आता पुन्हा लॉकडाऊन झाल्यास अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल. शिवाय बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होईल. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाऊन नकोच. - प्रवीण हिवरे, अध्यक्ष,एमआयडीसी असोसिएशन, वर्धा
आधीच्याच लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील सेवा व्यावसायिकांना दीडशे ते दोनशे कोटींचा फटका सहन करावा लागला. ग्रामीण भागातील अनेकांनी आपले व्यवसाय बदलवून मोलमजुरीचा रस्ता धरला. त्या सावटातून सावरले नाही; आता पुन्हा लॉकडाऊन झाले तर परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षाही भयावह होईल. आत्ताच या नव्या आदेशाने जिल्हाभरात जवळपास १०० विवाह सोहळे पुढे ढकलण्यात आले. इतकेच नाही तर एप्रिल, मे व जून महिन्यांतील बुकिंगही थांबले आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन झाले तर दुकानदारी विकावी लागेल.संजय ठाकरे, सचिव, वर्धा सेवा समिती.