४५ कोटींचा निधी मंजूर : विकास कामामध्ये होतेय राजकारण प्रशांत हेलोंडे । लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वाहतुकीची कोंडी सोडविण्यात रेल्वे उड्डाण पुलाची भूमिका महत्त्वाची आहे. या दृष्टीने सर्वंकष प्रयत्नांनी पुलाच्या रूंदीकरणास मंजुरी मिळाली. निधीही प्राप्त झाला; पण अतिक्रमण, पुनर्वसन, विद्युत लाईनचा प्रश्न खितपत आहे. शिवाय राजकारण आड येत असल्याने दीड महिन्यांपासून उड्डाण पुलाचे काम रेंगाळले आहे. आचार्य विनोबा भावे रेल्वे उड्डाण पुलाच्या रूंदीकरण कामासाठी ४५ कोटी रुपये मंजूर आहेत. यातील २४ कोटी रुपये पूल व रस्ता बांधकामावर खर्च होणार आहे. उर्वरित रक्कम महावितरण, पारेषण, नगर पालिका तथा बांधकाम विभागाच्या कार्यकक्षेतील कामांसाठी राहणार आहे. महावितरणकडून २ कोटी २७ लाख रुपयांची कामे केली जात आहेत. ही कामे प्रगतिपथावर असली तरी नगर पालिकेकडून प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर येत आहे. पालिकेला उड्डाणपूल परिसरात असलेले अतिक्रमण हटविण्याबाबत पत्र देण्यात आले आहे; पण त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न समोर येत असल्याने अतिक्रमण कायम आहे. परिणामी, पुलाचे कामही रेंगाळले आहे. रेल्वे उड्डाण पुलाच्या बोरगावकडील बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. शिवाय देवळीकडील मार्गावरही अतिक्रमण आहे. हे दोन्ही ठिकाणचे अतिक्रमण हटविणे अत्यंत गरजेचे आहे. शिवाय रूंदीकरण कक्षेत पाईपलाईन आहे. सदर पाईपलाईन हटविणेही गरजेचे आहे. यासाठी पालिकेने अद्याप पुढाकार घेतला नसल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे. शिवाय अतिक्रमण धारकांबाबत राजकारण होत असल्याने पुलाचे काम रखडत असल्याचा आरोपही होत आहे. महत् प्रयासाने मंजूर झालेला रेल्वे उड्डाणपूल स्थानिक राजकारणामुळे रखडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महावितरणकडून २.२७ कोटींची कामे सुरू विद्युत वायर बदलणे, खांब व सर्व्हीस केबल अन्यत्र हलविणे आदी कामे महावितरणद्वारे सुरू आहे. पुलाच्या रूंदीकरण हद्दीत तीन फीडर येतात. यातील दोन-दोन केबल बदलण्याची ४.७ किमीमधील कामे सुरू आहे. देवळी मार्गावर अर्धा किमी अंतरावरील विद्युत खांब हलविणे, तारा जोडणे ही कामे सुरू आहे. दोन खांबांचा वाद असल्याने विलंब होत असून एक-दोन दिवसांत ते पूर्ण होणार आहे. वायगाव रोडवरील ४०० मिटर खांब बदलणे व तारा टाकण्याचे काम पूर्ण झाले. उड्डाण पुलाजवळील ओव्हर हेड केबलचे काम प्रलंबित आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाची परवानगी मागितली आहे. मंजुरी मिळताच ते काम पूर्णत्वास नेले जाणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. अधिकारी, पदाधिकाऱ्यांची चुप्पी रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाबाबत अधिकारी, पदाधिकारी चुप्पी साधून असल्याचेच दिसून आले. नगराध्यक्षांनी दुसऱ्या कामात असल्याचे सांगितले तर न.प. मुख्याधिकाऱ्यांचा भ्रमणध्वनी उत्तर देत नव्हता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी सुटी असल्यामुळे माहिती देता येणार नसल्याचे सांगितले. केवळ महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे सोपविलेली कामे पूर्णत्वास नेत असल्याच्या प्रतिक्रीया दिल्या.
अतिक्रमणात अडकला उड्डाणपूल
By admin | Published: May 11, 2017 12:36 AM