महात्मा जोतिबा साहित्य नगरी (वर्धा) : देशात शेतकऱ्यांचा पक्ष उरलेला नाही. पंजाबराव देशमुखांनंतर शेतकऱ्यांना दुसरा पुढारी मिळालेला नाही. भारत हा कृषिप्रधान देश असूनही ८६ टक्के शेती कोरडवाहू आहे. देशात स्वतंत्र रेल्वे बजेट आहे, परंतु स्वतंत्र कृषी बजेट नाही; यापेक्षा दुसरी शोकांतिका काय असू शकेल, अशा शब्दात ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी विचार मांडले.महात्मा जोतिबा फुले साहित्य नगरीत (मातोश्री सभागृह) शनिवारी पहिल्या अखिल भारतीय शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ. वाघ यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष शरद जोशी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाहीत. त्यांनी आपले भाषण छापील स्वरुपात पाठविले, त्याचे यावेळी वाचन करण्यात आले. स्वागताध्यक्ष म्हणून सरोज काशीकर व्यासपीठावर विराजमान होत्या.शेतीला पाणी नाही, हेच शेतकरी आत्महत्येचे प्रमुख कारण आहे. पाण्याशिवाय पीक येऊ शकत नाही, हे तुकडोजी महाराजांना कळले होते. शेतात बीजे पेरुन पीक घेतले तर देशाची आर्थिक स्थिती मजबूत होते, हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितले. मात्र ६५ वर्षांपासून सत्ता उपभोगणाऱ्या राजकीय मंडळींना हे कळू शकले नाही, अशी टीकाही डॉ. वाघ यांनी केली.बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून भीमराव पांचाळे, माजी खासदार सुरेश वाघमारे, संजय पानसे, डॉ. शेषराव मोहिते, कैलास पवार, स्मिता गुरव, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, संजय इंगळे तिगावकर, माया पुसदेकर विराजमान होते. डॉ. वाघ पुढे म्हणाले, महात्मा फुलेंनंतर साहित्यात शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदना व संवेदनाच्या जाणिवांचा अभाव दिसून येतो. इतर वर्गापेक्षा शेतकऱ्यांची जाणीव वेगळी आहे. पावसामुळे शेती वाहून गेली, शेतकरी रडतो आहे. हे जाणून घेऊन लिहिलेले साहित्यच खरे शेतकरी साहित्य असेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सरोज काशीकर म्हणाल्या, शेतकरी जोपर्यंत स्वबळावर उभा राहणार नाही, तोपर्यंत या देशाचा आर्थिक विकास होणे शक्य नाही. जे साहित्य शेतकऱ्यांसाठी लिहिले ते वास्तववादी नाही. ते केवळ मृगजळ आहे. डोळ्यांवरील हिरवी पट्टी काढण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे, यापुढे लेखणी हे हत्यार म्हणून वापरले पाहिजे, तरच शेतकऱ्यांच्या आंदोलनाला धार येईल. प्रास्ताविकातून गंगाधर मुटे यांनी शेती साहित्यात वास्तववादी लेखनाचा अभाव असून जे लिहिले ते खोटे आहे. लेखणी हाती घेताना पहिले गावाचे चित्र बघावे, असेही ते म्हणाले. यावेळी भीमराव पांचाळे व मान्यवरांची भाषणे झाली. संचालन प्रा. मनीषा रिठे यांनी केले. संमेलनाला शेतकरीवर्ग उपस्थित होता. (जिल्हा प्रतिनिधी)७० टक्के लोकांच्या आयुष्याचे प्रतिबिंब साहित्यात पडलेच नाही- शरद जोशीदरवर्षी पावसाळा यायच्या आधी बी बियाण्यांची जमवाजमव, खर्चासाठी सावकाराची मिनतवारी, सोसायटीतली कारस्थाने, भानगडी, पाऊस येतो की नाही याची चिंता, आल्याचा आनंद, येत नसला तर पोटात उठणारा भीतीचा गोळा, पिकावर येणाऱ्या तणांच्या आणि रोगांच्या धाडी, पीक उभे राहिल्यावर होणारा आनंद, बाजारात गेल्यावरची शोकांतिका, वाढते कर्ज, पुढाऱ्यांची मग्रुरी, आग लागल्यावर घरातून निसटतांना व्हावी तशी गावच्या आयुष्यातून सुटण्याची ज्याची त्याची स्वत:पुरती धडपड या किड्यांसारख्या जीवनात लिहिण्यासारखी प्रचंड सामुग्री, पण ७० टक्के लोकांच्या आयुष्याचे प्रतिबिंब साहित्यात कधीच पडले नाही, अशी खंत संमलेनाध्यक्ष शरद जोशी यांनी आपल्या छापील अध्यक्षीय भाषणातून मांडली आहे.संमेलनाध्यक्ष व उद्घाटकांची अनुपस्थितीसंमेलनाध्यक्ष शरद जोशी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे संमेलनाला उपस्थित राहू शकले नाही. त्यांचे छापील अध्यक्षीय भाषणाचे संमेलनात वाचन करण्यात आले. या भाषणातून त्यांनी उपस्थित राहू शकत नसल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. उद्घाटक म्हणून इंद्रजीत भालेराव यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र तेसुद्धा उपस्थित होऊ न शकल्यामुळे ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कृषिप्रधान देशाला कृषी बजेटच नाही
By admin | Published: March 01, 2015 1:26 AM