उल्हास जाजू : अध्ययन मंदिरामध्ये सेंद्रीय शेतीवर कार्यशाळा; १२ गावांतील १०० वर शेतकऱ्यांचा सहभागसेवाग्राम : शेतातील तणामुळे पिकाला आधार होतो. विविध प्रकारचे तण माती सुपिक ठेवण्याचे कार्य करते. त्यामुळे तणमुक्ती नव्हे तर तणनाशकमुक्ती हवी, असे मत डॉ. उल्हास जाजू यांनी व्यक्त केले.सेवाग्राम रुग्णालय, सामूदायिक आरोग्य विमा, सेंद्रीय शेती प्रकल्पांतर्गत हमदापूर, मदनी परिसरातील ३० गावांतील शेतकऱ्यांसह आरोग्य तसेच सेंद्रीय शेती विषयावर काम केले जाते. सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सेवाग्राम येथील अध्ययन मंदिरात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेला दगडकर, वसंत फुटाणे, प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. जाजू म्हणाले की, सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून व्रतपूर्वक शेती करणाऱ्या लोकांना या मोहिमेत सहभागी करून सेंद्रीय शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे. याला बऱ्यापैकी प्रतिसादही मिळत आहे. दगडकर यांनी स्वत:च्या शेतीतील तणावर केलेले विविध प्रयोग, अनुभव शेतकऱ्यांसमोर कथन केले. निंदलेले तण आळीपाळीने एका तासातून दुसऱ्या तासात टाकावे. निंदण, डवरणीसोबतच तणनाशक हे शेतीला तारक नसून मारक आहे. स्वच्छ भारत ठिक; पण शेती ही तणाने स्वच्छ करू नये, असे दगडकर यांनी अनुभवातून शेतकऱ्यांना सांगितले. वसंत फुटाणे यांनी तणनाशक फवारणीमुळे उद्भवलेले विविध आजारांवर चित्राद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत हमदापूर, बावापूर, मदनी, तुळजापूर, वघाळा, कुटकी, तळोदी, करंजी भोगे, करंजी काजी, पुजई, हिवरा, टाकळी किटे आदी गावांतील शंभरावर शेतकरी सहभागी झाले. शेतकऱ्यांनी तणनाशकामुळे ज्या घटना घडल्या, त्याचे व पुढील पिकाचे नियोजन तसेच तणनाशक दूर ठेवण्यासाठी विविध सेंद्रीय प्रयोगांबाबत दगडकर यांच्याकडून माहिती जाणून घेतली. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाकरिता प्रकाश डंभारे, डॉ. विठ्ठल, डॉ. सुमीत जाजू, सुरेश बोडखे यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.(वार्ताहर)
शेती तणमुक्त नव्हे, तर तणनाशकमुक्ती हवी
By admin | Published: December 04, 2015 2:21 AM