लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्ह्यात स्वच्छ भागात मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्थायित्व व सुजलाम् अभियान राबविले जात आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून स्वच्छ व सुंदर गावाच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून गावागावांत सध्या शोषखड्डे तयार केले जात आहेत. आतापर्यंत तब्बल ७८९ शोषखड्ड्यांचे काम पूर्ण झाले असून तब्बल १ हजार २८ शोषखड्ड्यांचे काम युद्धपातळीवर पूर्ण होत आहे. अवघ्या १०० दिवसांत तब्बल ४० हजार शोषखड्डे तयार करण्याचा मानस जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा असून त्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.आष्टी तालुका अव्वल- जिल्ह्यात एकूण ५१७ ग्रामपंचायती असून गावपातळीवर सध्या शोषखड्डे तयार केले जात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ७८९ शोषखड्ड्यांचे काम पूर्ण झाले असून यात सर्वाधिक शोषखड्डे आष्टी तालुक्यातील गावांमध्ये करण्यात आले आहेत. आष्टी तालुक्यात आतापर्यंत २०४ शोषखड्ड्यांची कामे पूर्ण झाली असून १०८ शोषखड्ड्यांचे काम युद्धपातळीवर प्रगतीपथावर आहे.
प्रत्येक पंचायत समितीला पाच हजार शोषखड्ड्यांचे उद्दिष्ट- अवघ्या १०० दिवसांत जिल्ह्यात ४० हजार शोषखड्डे तयार करण्याचा जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा मानस असून जिल्ह्यातील आठही पंचायत समितींना प्रत्येकी ५ हजार शोषखड्डे तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पंचायत समितींचेही बारकाईने लक्ष आहे.
निरोगी ग्रामस्थांसाठी शोषखड्डे महत्त्वाचे- नाल्यांअभावी सांडपाणी रस्त्याने वाहते. बहुधा सांडपाण्याचे डबके नागरिकांच्या घराशेजारीच साचत असल्याने ग्रामस्थांना डासांच्या त्रासाला तसेच डासांपासून होणाऱ्या कीटकजन्य आजारांना सामोरे जावे लागते. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागावी तसेच निरोगी ग्रामस्थ यासाठी शोषखड्डे महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले.
स्वच्छ व सुंदर तसेच निरोगी गावासाठी शोषखड्डे महत्त्वाचे आहेत. शोषखड्ड्यांमुळे सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागत असून प्रत्येक गावातील नागरिकांनी स्थायित्व व सुजलाम् अभियानात सहभागी होऊन गावात जास्तीतजास्त शोषखड्डे तयार करून सहकार्य करावे.- डॉ. सचिन ओम्बासे, मुख्य कार्यपालन अधिकारी, वर्धा.
उघड्यावरील सांडपाण्याची गावस्तरावर समस्या असून यापासून नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. स्वच्छ व निरोगी गाव परिसराच्या उद्देशाने प्रत्येक घरी शोषखड्डा नागरिकांनी तयार करावा.- यशवंत सपकाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जि.प., वर्धा