लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी एसटी कामगार संयुक्त कृति समितीअंतर्गत २८ ऑक्टोबरपासून अचानक संप पुकारला. शासनाने काही महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यामध्ये वाढ केल्याने कृति समितीकडून हा संप मागे घेण्यात आला. मात्र, राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत विलीनीकरण करा, या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने कर्मचाऱ्यांनी २९ ऑक्टोबरपासून संप कायम ठेवला. वर्धा आगारातून या दिवसात एकही बस बाहेर पडली नाही. इतर आगारातील मोजक्याच बसफेऱ्या सुरु होत्या. त्या रविवारी बंद करण्यात आल्यात. ऐन दिवाळीच्या दिवसात लालपरी आगारातच थांबली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण झाली असून महामंडळाला कोट्यवधीचा फटका बसला आहे.
२,११,००,००० रुपये एसटीचे नुकसान- वर्धा, आर्वी, तळेगाव (श्याम.पंत), पुलगाव आणि हिंगणघाट हे पाच आगार असून दररोज ८५० बसफेऱ्यांचे नियोजन आहे. या संपामुळे वर्धा आगार ११ दिवसांपासून बंद आहे.- तळेगाव आगारातील बससेवा आजपर्यंत सुरू होती, तर इतर आगारातील मोजक्याच बसफेऱ्या सुरू होत्या. पण, रविवारी सर्वच बसफेऱ्या बंद करण्यात आल्याने आतापर्यंतच्या २ कोटी ११ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
प्रवाशांच्या खिशाला कात्री- दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे सुरक्षित प्रवास म्हणून नागरिक एसटी बसच्या प्रवासाला प्राधान्य देतात. पण, सध्या संप सुुरू असल्याने बसस्थानकावर शांतता दिसून येत आहे. बसेस नसल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांमधून प्रवास करावा लागत आहे.- या दिवसात बसस्थानकावरील गर्दी आता खासगी वाहन स्थळावर दिसून येत आहे. खासगी वाहनचालकांकडूनही या संधीचा फायदा घेतल्या जात आहे. वाढीव तिकीट घेऊन प्रवास करावा लागत आहे. गावखेड्यातील बसेस बंद असल्याने ऑटोशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे प्रवास महागल्याने खिशावर ताण पडत आहे. यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
एसटी कर्मचाऱ्याच्या पदरात काय पडले?- वेतनवाढीचा दर ३ टक्के तर भत्तावाढ ८,१६,२४ नुसार लागू करावी. कर्मचाऱ्यांना वाढीव ५ टक्के भत्ता लागू करावा. ऑक्टोबर २०१९ पासून १२ टक्के महागाई भत्ता देण्यात यावा, आदी मागण्यांकरिता एसटी कामगारांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने २८ ऑक्टोबरला अचानक उपोषण सुरू करून संप पुकारला. - शासनाने तातडीने बैठक बोलावून एसटीच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता आणि घरभाड्यातही वाढ करण्याची घोषणा केली. त्यामुळे संयुक्त कृती समितीने उपोषण मागे घेते. परंतु कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करा, हा मुद्दा दुर्लक्षित राहिल्याने याकरिता कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवला.
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पाचही आगारात टप्प्या टप्प्यात संप सुुरू केला आहे. काही आगार पहिल्या दिवसांपासून बंद आहे. दिवाळीच्या हंगामात प्रवाशी संख्या जात राहत असल्याने दरदिवसाला ३५ लाखांची मिळकत होते. पण, आता या संपामुळे दिवाळीचा हंगाम केल्याने दोन कोटी रुपयांवर नुकसान झाले आहे. विजय घायडे, विभागीय वाहतूक अधिकारी, वर्धा